तुरंबे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील गणपती मंदिराजवळील ओढ्याच्या परिसरात सुमो गाडी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात राशिवडे येथील १७ वर्षीय विद्यार्थी शाहू मधुकर शिंदे याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राशिवडे तसेच तुरंबे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तुरंबे येथे शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा पाहण्यासाठी राशिवडे येथील काही विद्यार्थी आले होते. स्पर्धा संपल्यानंतर विद्यार्थी दुचाकीवरून आपल्या गावी परतत होते. त्यावेळी गणपती मंदिराजवळील ओढ्याच्या परिसरात समोरून येणाऱ्या सुमो गाडीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत शाहू मधुकर शिंदे याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या मार्गावर शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच अन्य वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रस्ता अरुंद असल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यास त्यांना बाजू देणेही कठीण होते. त्यामुळे या मार्गावरील अडथळे आणि अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून होत आहे.
तुरंबे गावापासून गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता अरुंद असून, त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झाल्याचे चित्र आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आडव्या आल्याने वाहनचालकांना समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नाहीत. विशेषतः वळणाच्या ठिकाणी समोरचे वाहन अचानक नजरेस पडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे आणि झाडांच्या अडथळ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.