बांबवडे : कोल्हापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील जुळेवाडी खिंड येथील वळणावर चिरा भरलेला ट्रक कोकणातून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना अंदाजे 40 फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत ट्रकचालक जागीच ठार झाला.
मृत चालकाचे नाव रवींद्र शिवाजी चव्हाण (वय 35, रा. माले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे आहे. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक चे मोठे नुकसान झाले असून रवींद्र यांचा मृतदेह देखील अपघात स्थळी अडकलेला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी मोठया शिताफीने ट्रकच्या केबीन मध्ये सापडलेला मृतदेह बाहेर काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वळणावरील तीव्र उतार कारणीभूत असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अपघाताची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.