नागाव : अतिशय वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाटा येथील उड्डाणपुल उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसांपासून या ठिकाणी महाकाय क्रेनच्या साहाय्याने आडवे गर्डर ( बिम ) बसवण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे येत्या काही महिन्यात या उड्डाणपूलाचे काम पुर्ण होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सहाजिकच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.
या पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गर्डरचे वजन ७० टन असून प्रत्येक गर्डर बसवण्यासाठी अडिच तासाचा कालावधी लागतो आहे असे एकूण १० गर्डर बसवण्यात येणार आहेत. हातकणंगले तालुक्यातील नागाव फाटा हा महामार्गावरील एक महत्त्वाचा स्पॉट मानला जातो. या ठिकाणी होणारी वाहनांची प्रचंड गर्दी आणि क्रॉसिंगमुळे अनेकदा लांबच लांब रांगा लागून छोटे मोठे अपघात घडले आहेत. या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहीना कायमचे अपंगत्व आले आहे.
सध्या होणाऱ्या सहा पदरी रस्त्यावर नागाव फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पण गेली दीड दोन वर्षापासून उड्डाणपूल बांधण्यासाठी महाकाय मोठे काँलम उभे करण्यात आले. पण त्यावर आडवे गर्डर (बीम ) टाकण्यात आले नव्हते. पण शुक्रवारी सायंकाळपासून या उड्डाणपुलाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी सहा महिण्याचा कालावधी लागणार आहे . उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर, महामार्गावरील थेट वाहतूक पुलावरून जाईल, तर स्थानिक वाहतूक पुलाखालून सुरक्षितपणे मार्गस्थ होईल. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाचीही बचत होणार आहे.
सध्या सुरू असलेल्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे गर्डर उचलण्यासाठी शक्तिशाली हायड्रॉलिक क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत. एका गर्डरचे वजन ७० टनापर्यंत असल्याने असे एकूण १० गर्डर दोन्ही बाजूस आहेत हे बसवताना कोणताही अनुचित घटना घडू नये साठी महामार्ग अधिकारी व शिरोली पोलिस दक्षता घेत असून महाकाय क्रेनच्या साहाय्याने काम सुरू होते त्यावेळी खबरदारी घेऊन हा रस्त्यावरील वाहतूक रोखली जाते.