कोल्हापूर : शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी जाहीर केला. बारावी परीक्षेत यंदाही कोल्हापूर जिल्ह्याने विभागात अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवली. कोल्हापूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी 94.40 इतकी आहे. यंदाही मुलींनी पुन्हा एकदा कर्तृत्व सिद्ध करीत निकालात बाजी मारत त्या ‘लय भारी’ ठरल्या.
गतवर्षी चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर विभागाने यंदा थेट दुसर्या स्थानावर झेप घेतली असली, तरी 0.60 टक्क्याने निकालात घसरण झाली. गतवर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल 94.24 टक्के लागला होता. यावर्षी 93.64 टक्के निकाल लागला आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 96.92 टक्के असून, हे मुलांपेक्षा 6.21 टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. कोल्हापूर, सांगली, सातारा 1 हजार 12 कनिष्ठ महाविद्यालयांत ही परीक्षा झाली.
कोल्हापूर विभागातून 1 लाख 13 हजार 889 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 6 हजार 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 93.64 टक्के आहे. मुला-मुलींच्या निकालाची तुलना करता, यंदा 59 हजार 726 मुले परीक्षेला बसली, त्यापैकी 54 हजार 181 उत्तीर्ण झाली. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 90.71 टक्के आहे. 53 हजार 469 मुली परीक्षेला बसल्या, त्यापैकी 51 हजार 826 उत्तीर्ण झाल्या असून, टक्केवारी 96.92 आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 48 हजार 836 नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 46 हजार 105 उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 94.40 आहे. सांगलीतून 31 हजार 207 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 29 हजार 145 उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 93.39 इतकी आहे. सातारा जिल्ह्यातून 33 हजार 152 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 30 हजार 754 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी 92.76 आहे.
कोल्हापूर विभागातून 4 हजार 16 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी प्रत्यक्ष नोंदणी केली होती. त्यामधील 3 हजार 978 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 2 हजार 276 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 57.21 इतकी आहे.
शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून खेळाडू, एनसीसी, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलत गुण देण्यात येत आहेत. त्यानुसार यावर्षी राज्यातील सुमारे 20 हजार 943, तर कोल्हापूर विभागातील 2 हजार 333 विद्यार्थ्यांना प्रावीण्याचे गुण देण्यात आले आहेत.
परीक्षेत कॉपी केल्याचे सिद्ध झाल्यामुळे 25 विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली.
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी http:/// mahahsscboard.in या संकेतस्थळावर 6 मे ते 20 मे या कालावधीत अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी ई-मेल, हस्तपोेच, रजिस्टर पोस्ट यापैकी एक पर्याय विद्यार्थ्यांना वापरता येईल. यासाठी 6 मे ते 20 मेदरम्यान विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
पत्रकार परिषदेला सहायक शिक्षण संचालक स्मिता गौड, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, विभागीय सहसचिव डी. जी. किल्लेदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.