Kolhapur Mumbai Flight Service |कोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ-संध्याकाळ विमानसेवा Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Mumbai Flight Service |कोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ-संध्याकाळ विमानसेवा

2 मार्चपासून दर मंगळवार, गुरुवारी सुविधा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर - मुंबई मार्गावर आता सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळा विमानसेवा सुरू होणार आहे. दि. 2 मार्चपासून दर मंगळवार आणि गुरुवारी ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध होईल. लवकरच आठवड्यातील सर्व दिवस ही सेवा सुरू होईल असे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

सध्या स्टार एअरची मुंबईसाठी सकाळी दैनंदिन विमानसेवा आहे. मात्र, सायंकाळीही मुंबईसाठी विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात विमानसेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. अनेकांना सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत येता येईल, तसेच मुंबईहून कामानिमित्त कोल्हापुरात येणार्‍यांनाही काम आटोपून परत सांयकाळी मुंबईला जाता येईल.

गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या या मागणीनुसार स्टार एअरकडून सायंकाळीही सेवा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात आठवड्यातून दर मंगळवार आणि गुरुवारी ही सेवा उपलब्ध असेल. सकाळी मुंबईसाठी साडेदहा वाजता, तर सायंकाळी सहा वाजता ही सेवा मिळेल. मुंबईतून कोल्हापूरसाठी सकाळी साडे नऊ वाजता आणि दुपारी साडेचार वाजता विमानसेवा उपलब्ध होईल.

लवकरच आठवड्यातील सातही दिवस सायंकाळीही मुंबईसाठी सेवा नियमित सुरू होईल, मुंबईतून सायंकाळी सात-साडेसातनंतर ती उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर-मुंबई मार्गावर रात्रीही विमानसेवा सुरू करण्यासाठी हा प्रायोगिक टप्पा म्हणावा लागेल. विमानसेवेसाठी सुविधा दिल्या आहेत. लवकरच रात्रीही विमानसेवा सुरू राहील, यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT