कोल्हापूर

कोल्हापूर : ऊस आंदोलक स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षासह तिघांना अटक; पेठवडगाव पोलिसांची कारवाई

backup backup

किणी; पुढारी वृत्तसेवा : वारणा कारखान्याला ऊस भरून जाणारा ट्रॅक्टर अडवून नुकसान केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह चौघांना आज (दि. १५) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मागील वर्षीचे ऊसाचे चारशे रुपये आणि चालू वर्षीच्या गळीत हंगामाला साडेतीन हजार रुपयाची पहिली उचल द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. निर्णय जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करायची नाही असा इशाराही दिला होता. मागील वर्षीचे फरक कारखाने तोट्यात असल्याने देण्यास असमर्थ असल्याचे साखर कारखानदार सांगत आहेत.

साखर कारखानदारांनी साखर कारखाने सुरू करून ऊस तोडी सुरू केल्या होत्या. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध करत आंदोलन आक्रमक केले होते. ट्रॅक्टर फोडाफोडीलाही सुरुवात झाली होती. याच दरम्यान कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश जारी केला होता. यातूनच दोन दिवसांपूर्वी सावर्डे ता हातकणंगले येथून धनाजी शिंदे यांचा ऊस भरून वारणा कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर मध्यरात्री बाराच्या सुमारास तळसंदेजवळ आला असता अज्ञात दहा ते बारा जणांनी तो अडविला, आंदोलन सुरू असताना ऊस वाहतूक का करतोस असे विचारत ट्रॅक्टरचा चालक अतुल शिवराज आंबटवाड (रा.आलेगाव, ता.कंधार,जि.नांदेड) यांच्याकडून ट्रॅक्टरच्या चाव्या व मोबाईल काढून घेण्यात आला. त्यांनतर दगडफेक करत ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडण्यात आले. तसेच चालकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पंक्चर काढण्यासाठी वापरण्यात येणारे सोल्युशन ओतून चारही टायर्स जाळण्यात आल्या. याबाबतची फिर्याद चालकाने वडगाव पोलिसांत दिल्याने अज्ञात दहा ते बारा लोकांविरुद्ध वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानुसार स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव शंकर कांबळे,संपत दत्तू पवार,हरी गणपती जाधव,सुनील गोविंद सूर्यवंशी यांना अटक केली होती.

अटक केलेल्या सर्वांना आज (दि. १५) पेठ वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी बोलताना वैभव कांबळे म्हणाले की आंदोलन चिरडण्यासाठी साखर कारखानदार पोलीस बळाचा वापर करून कार्यकर्त्यांच्या वर खोट्या तक्रारी करत आहेत.पण स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT