समर चव्हाण याला पोलीस घेऊन जाताना  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Gold Theft | चुलत्याच्या घरातून १५ तोळे सोने चोरले; पुतण्याने खरेदी केली नवी कोरी थार

पन्हाळा तालुक्यातील सातवेतील प्रकार; १४ लाख ५० हजारांचे दागिने लंपास, सोनारासह दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

Jeweller Gold Case Kolhapur

वारणानगर : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय पुतण्याने चुलत्याच्या घरातील तिजोरीतून १५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. हे दागिने सोनाराकडे मोडून मिळालेल्या पैशांतून त्याने चक्क नवी कोरी थार गाडी खरेदी केल्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी संशयित समर पोपट चव्हाण आणि दागिने खरेदी करणारा सोनार संग्राम बाबासाहेब मोरे (रा. देववाडी, ता. शिराळा, जि. सांगली) या दोघांना अटक केली आहे. चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत १४ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

सातवे येथील उमेश मारुती चव्हाण हे शेतीसह दुग्धव्यवसाय करतात. त्यांचा चुलत पुतण्या समर याचे त्यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. या ओळखीचा फायदा घेत समरने घरातील तिजोरीत ठेवलेले सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा संशय आहे. गणेशोत्सवाच्या काळात ही चोरी झाल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, समरने दसऱ्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरातील शिरोली येथील एका शोरूममधून नवीन थार गाडी खरेदी केली होती. गाडीच्या पुजेची तयारी सुरू असताना उमेश चव्हाण यांच्या पत्नी त्रिवेणी यांनी ग्रामदैवताच्या जागरासाठी दागिने घालण्याच्या उद्देशाने तिजोरी उघडली. मात्र, त्यातील दागिन्यांची पिशवी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात शोधाशोध करूनही दागिने मिळाले नाहीत.

दुसरीकडे, आर्थिक परिस्थिती बेताची असताना समरने महागडी गाडी खरेदी केल्याने नातेवाइकांच्या मनात संशय निर्माण झाला. चौकशी केली असता तो एका शेअर कंपनीत काम करत असल्याने त्याला चांगले पैसे मिळतात, असे सांगण्यात आले. मात्र, दागिने चोरीला गेल्याचा संशय बळावल्याने उमेश चव्हाण यांनी १९ ऑक्टोबर रोजी कोडोली पोलिसांत फिर्याद दाखल केली.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत समरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेले दागिने त्याने सोनार संग्राम मोरे याच्याकडे मोडून सुमारे १० लाख रुपये रोख घेतले आणि त्यातून थार गाडी खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून पन्हाळा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी थार गाडीसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्रीकांत ठिकाणे पुढील तपास करीत असून, हवालदार युवराज पाटील, पोलीस कर्मचारी महेश कदम, बाबासो किटे, अमोल चव्हाण आणि महेश शिंदे यांनी तपासात सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT