सोहाळे; पुढारी वृत्तसेवा : पाण्याच्या शोधात असलेला गवा दलदलीच्या खड्ड्यात अडकला. रविवारी (दि. १४) दुपारी ३ वाजताच्या सुमारास मसोली (ता.आजरा) येथे ही घटना घडली. वनविभागाची टीमने या गव्याला बाहेर सुखरुपणे बाहेर काढले आहे.
मसोली येथील बंडू विश्राम तेजम यांच्या डोबा नावाच्या शेतात अंदाजे पाच ते सात फुट उंचीचा दलदलयुक्त खड्डा आहे. पुर्वी त्या ठिकाणी विहीर होती, मात्र सध्या ती बुजत आली आहे. त्यामुळे त्यामध्ये कमी प्रमाणात पाणी असून मोठ्या प्रमाणावर दलदल व बाजूने गवतही वाढले आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पांडूरंग सुतार हे जनावरे चारण्याकरिता गेले असता त्यांना खड्डयामध्ये गवा अडकून बसल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती शेतमालकासह वनविभागाला दिली.
दरम्यान वनपाल सुरेश गुरव, वनमजूर रमेश पाटील, शिवाजी मटकर आदींच्या टीमने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. व स्थानिकांच्या मदतीने जेसीबी मशीन बोलावून अडकलेल्या गव्याला बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे. हा गवा पाण्याच्या शोधात आला असावा अशी सांगितले जात आहे.