सुनील सकटे
कोल्हापूर : महापूराचा धोका टाळण्यासाठी सांगली फाटा ते उचगाव आणि कागल येथे पिलर पुलासाठी निविदा प्रसिध्द झाली आहे. यामध्ये तावडे हॉटेल येथे बास्केट बि—जचाही समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याशी संपर्क साधून पिलर पुलाबाबत आग्रही भूमिका घेत हा प्रश्न तडीस लावला आहे.
गेल्या काही वर्षांत कोल्हापूरला महापुराचा फटका बसत आहे. 2019 साली महापुराने जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला होता. तर महामार्गावर पाणी आल्याने पुणे बंगरुळ महामार्ग आठ दिवस बंद झाला होता. सांगली फाटा ते कोल्हापूर या ठिकाणी भितींचा पूल असल्याने महापुराच्या पाण्याचा निचरा होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याठिकाणी पिलर पूल उभारण्यात यावा अशी मागणी झाली. यासंदर्भात दै. ‘पुढारी’ ने सातत्याने आवाज उठवून हा प्रश्न लावून धरला, तर खा. धनंजय महाडिक यांनी बास्केट बि—ज होण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
सांगली फाटा ते उचगाव या ठिकाणी हा पिलरचा उड्डाण पूल मंजूर झाला आहे. यासाठी साडेसातशे कोटी रुपयांची निविदा प्रसिध्द झाली आहे. तर कागल येथे पिलरपूलासाठी सुमारे 300 कोटींची निविदा प्रसिध्द झाली आहे. पिलर पूल मंजूर होउन निविदा प्रसिध्द झाल्याने महामार्गावरील महापुराचा धोका टळणार आहे. सांगली फाटा ते उचगाव या सुमारे 5 किलोमीटर लांबीचा हा उड्डाण पूल आहे. यामध्ये विशिष्ट आकाराचे पिलर उभारण्यात येणार आहेत. पंचगंगा नदीवर मोठा पूल बांधण्यात येणार आहे. उचगाव येथे लहान पूल आणि रेल्वे पूलाचा समावेश आहे. याबरोबरच नागरिकांसाठी भुयारी मार्गाचेही नियोजन करण्यात आले आहे. पिरल पुलामुळे महापुराच्या पाण्याचा तातडीने निचरा होण्यास मदत होणार आहे.
सांगली फाटा ते उचगाव या मार्गावर भिंतीऐवजी पिलरचा पूल उभारण्यात यावा, यासाठी दै. ‘पुढारी’ने सातत्याने आवाज उठविला आहे. या कामासाठी निविदा प्रसिध्द झाल्याने दै.‘पुढारी’च्या पाठपुराव्यास यश आले आहे.