कोल्हापूर

Kolhapur News: अंबाबाई, जोतिबा मंदिरसह आदमापूर, नृसिंहवाडी, खिद्रापुरात सुरक्षा यंत्रणेत वाढ

पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा : शस्त्रधारी जलद प्रतिसाद पथके नियुक्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोल्हापूर पोलिसांनी करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिर, आदमापूर, नृसिंहवाडी, खिद्रापूरसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांसह आणि वर्दळीच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. अत्याधुनिक शस्त्रधारी जलद प्रतिसाद पथकांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, अण्णासाहेब जाधव यांनी शहर, जिल्ह्यातील धार्मिकस्थळांना मंगळवारी भेटी देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

कोल्हापुरातील रंकाळा तलावसह विशाळगड, पन्हाळा, राधानगरी अभयारण्य, रांगणा, भुदरगड, पारगड, सामानगड, गगनगड याठिकाणीही स्थानिक पोलिस यंत्रणेचा चोख पहारा ठेवण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी सोमवारी रात्री उशिरा स्वत: व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी मंगळवारी अंबाबाई मंदिराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या चारही सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह पोलिसांचा फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे. शिवाय अत्याधुनिक शस्त्रधारी जलद प्रतिसाद पथके नियुक्त करण्यात आली आहेत. याशिवाय गृहरक्षक दलाचे जवानही बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. धार्मिक स्थळाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा तातडीने अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील तावडे हॉटेल, ताराराणी चौक, संभाजीनगर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, कसबा बावडा, शिवाजीपूल, उजळाईवाडी उड्डानपुलासह नवीन वाशी नाका परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. याशिवाय महामार्गावरही स्थानिक पोलिसांची पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत.

गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी सकाळी नृसिंहवाडी, खिद्रापूर येथील धार्मिक स्थळांना भेटी देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड येथील प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT