विशाळगड : रत्नागिरी येथे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी निघालेल्या शिक्षकांच्या गाडीला झालेल्या अपघातामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षण संचालक राहुल रेखावार यांच्या 'अमानवीय लष्करी शिस्ती'च्या अंमलबजावणीचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या संचालक पदावरून हकालपट्टीच्या मागणीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक १३ जून २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. अपघातामुळे शिक्षक मानसिक तणावात असताना, संचालक राहुल रेखावार यांनी प्रशिक्षणासाठी उशीर झालेल्या शिक्षकांना ऑनलाइन स्वरूपात बाहेर काढणे आणि नाहक त्रास देणे सुरू केले आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या अमानवीय आणि त्रासदायक कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी तसेच न्याय मागणीसाठी राहुल रेखावार यांची संचालक पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी या आंदोलनातून केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सर्व सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन एस. डी. लाड (अध्यक्ष, शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर), राहुल पवार (चेअरमन, मुख्याध्यापक संघ कोल्हापूर), आणि आर. वाय. पाटील (सचिव, मुख्याध्यापक संघ कोल्हापूर) यांनी केले आहे. शिक्षकांवरील या अन्यायकारक वागणुकीच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली असून, कोल्हापूरमधील या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.