कोल्हापूर : शहरात प्रवेश करताना पुलाखाली झालेली वाहतूक कोंडी.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | तावडे हॉटेल गायब, कमानही गेली, कोल्हापूर प्रवेशाची वाटच हरवली

महामार्गावरून शहरात येताना वाहनधारक संभ्रमात; पुलाखाली रोज वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल परिसराची ओळखच पुसट झाली आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश करताना वाहनधारकांना दिशा विचारावी लागते. ‘कोल्हापूर कुठे आहे? तावडे हॉटेल कुठे आहे?’ अशी विचारणा करणारे वाहनधारक दिसत आहेत. त्यात भर म्हणजे पंचगंगा नदी पार केली की, महामार्गाच्या पुलाखाली दररोज होणारी वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे.

एकेकाळी ‘तावडे हॉटेल आले म्हणजे कोल्हापूर आले’ अशी ओळख होती; मात्र २००१ मध्ये पूल बांधकामासाठी हे हॉटेल हटवले गेले. नाव मात्र टिकून राहिले. त्यानंतर कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर उभारलेली स्वागत कमानही धोकादायक ठरल्याने हटवली. आता ना तावडे हॉटेल, ना स्वागत कमान, त्यामुळे शहरात प्रवेश करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन करणारी कोणतीही ओळखच उरलेली नाही.

महामार्गावरून पंचगंगा नदी पार केल्यानंतर वाहनांना पुलाखाली वळसा घालून शहरात यावे लागते. याच ठिकाणी गांधीनगर आणि उचगावकडे जाणारे मार्ग जोडले जातात. परिणामी, वाहने, स्थानिक वाहतूक, एसटी बसेस, खासगी बसेस आणि अवजड वाहने एकाच ठिकाणी अडकतात. सकाळ-संध्याकाळ या परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

प्रवेशद्वारावरच नियोजनाचा अभाव

कोल्हापूर शहरात येणाऱ्या परगावच्या नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे; मात्र दिशादर्शक फलकांचा अभाव, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि पुलाखालील अरुंद मार्ग यामुळे शहराची पहिलीच ओळख विस्कळीत होत आहे. स्मार्ट सिटी आणि विकासाच्या चर्चा होत असताना शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराची ही अवस्था प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

सहापदरीकरणात बदल न केल्यास समस्या कायम

राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात उड्डाणपूल, जोडरस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या रचनेत बदल करणे गरजेचे आहे. केवळ रस्ता रुंद करून उपयोग नाही. शहरात प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था सुटसुटीत करणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT