यड्राव : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत 7 जणांनी महिलेच्या अंगावरील सव्वा तोळ्याचे सोने, चांदीचे दागिने, रोख 25 हजार रुपये असा 1 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच दोन ठिकाणी चोरी करताना नागरिकांना जाग आल्यामुळे चोरट्यांनी पलायन केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री भारत निर्माण पाणीपुरवठा फिल्टर हाऊसजवळ असणाऱ्या प्रसाद कुलकर्णी यांच्या मळ्यात घडली. या प्रकरणी विठ्ठल राजाराम गायकवाड यांनी शहापूर पोलिस ठाण्यात अज्ञात 7 जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे तारदाळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुलकर्णी मळ्यात विठ्ठल गायकवाड व त्यांच्या पत्नी राहण्यास आहेत. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. गायकवाड व त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण करून त्यांच्याकडून 8 ग््रॉमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, 5 ग््रॉमच्या रिंगा, पैंजण तसेच रोख 25 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. विठ्ठल यांच्या पाठीत कोपराने मारून ‘आप चिल्लायेंगे तो आपका खून कर देंगे, आप चुपचाप सो जाओ, हम आपके घर के बाहर ही बैठे है’ अशी धमकी देऊन घराला बाहेरून कडी लावून निघून गेले. दरम्यान, पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. यावेळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. गायकवाड यांच्या घरापासून समडोळे मळ्यापर्यंत श्वान गेले. मात्र, तिथून पुढे गेल्यानंतर श्वान तिथेच घुटमळले.