कोल्हापूर

Sweet Potato: शाहूवाडीत ‘रताळी’ काढणीस वेग; दसऱ्यात मागणी वाढणार

अविनाश सुतार


विशाळगड: पैसा देणारे पीक म्हणून रताळी (Sweet Potato) पिकाकडे पाहिले जाते. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे अधिक असून सध्या रताळी काढणीत बळीराजा व्यस्त आहे. शाहूवाडीतील रताळी नाशिक, बीड, नगर, औरंगाबाद, नवी मुंबई, गुजरात, पुणे, कऱ्हाड, सातारा, सुरत, बडोदा, गुजरात आदी बाजारपेठेत निर्यात होत आहे. रताळीस प्रतिक्विंटल २८०० ते ३१०० दर मिळत आहे.

चवीला गोड असलेल्या रताळीला (Sweet Potato) उपवासाच्या पदार्थांमध्ये स्थान असल्यामुळे उपवासाच्या काळात त्याची मागणी वाढते. ही मागणी लक्षात घेऊन रताळीची लागवड केली जाते. चालूवर्षी तालुक्यातून दहा हजार टन रताळी निर्यात झाली आहे. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भागातील पेरीड, निळे, कडवे, भोसलेवाडी, अमेणी, तुरुकवाडी, कोतोली, कांडवण, पणुंद्रे, शिंदेवाडी, माण, परळे, उचत, आंबार्डे, शिराळे, ओकोली, गोगवे, भैरेवाडी, सुपात्रे, सावे, कोपार्डे, शित्तूर, मलकापूर, चनवाड या परिसरातील शेतकरी रताळी व्यावसायिक पीक घेताना दिसतात.

नवरात्रौत्सवात रताळ्याला मोठी मागणी असते. खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड मृग नक्षत्रात केली जाते. रेती मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. चालूवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने उत्पादनात वाढ झाली. मात्र, रताळी मोठी न होता मध्यम स्वरूपाची मिळाली. तीन महिन्यांचे नगदी पीक नवरात्रौत्सव, ईद व दीपावली सणात काढण्यात येते. ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येतो. कमी खर्चात जादा उत्पादन देणाऱ्या या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. उसाला टनाला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळतो. मात्र, तीन महिन्यांत प्रति क्विंटल २८०० ते ३१०० रुपये दर मिळतो.

पाच ते सहा वर्षांपूर्वी दलाल अगर पेढ्यांमार्फत रताळी स्थानिक बाजारपेठेत पाठविली जात होती. आता शेतकरी स्वत: वाहनातून वाशी, मुंबई, पुणे, कऱ्हाड, कोकणच्या बाजारात रताळी विक्रीस नेण्याचे धाडस करीत असल्यामुळे जादा पैसे मिळत आहेत. उसापेक्षा रताळीला जादा दर मिळत असल्यामुळे रताळी हा प्रमुख व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

दसऱ्यामुळे मागणी वाढली

उपवासाच्या पदार्थांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे रताळी हे कंदमूळ बाजारात दाखल झाले आहे. दसऱ्याच्या काळात रताळीला मागणी वाढणार आहे. यामुळे दरात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी दसरा कालावधीत रताळांची वाढती मागणी लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत रताळीची मोठ्या प्रमाणात आवक करून ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT