हातकणंगले : येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला. 
कोल्हापूर

Raju Shetti| शेतकऱ्यांच्या घामाची योग्य किंमत मिळालीच पाहिजे

शेट्टी : स्वाभिमानीची ऊस दरप्रश्नी जिल्‍ह्यात मोटारसायकल रॅली

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : शेतकऱ्यांचा ऊस हा काही फुकटचा नाही. घामाची योग्य किंमत मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. चार दिवसांत कारखानदार आणि प्रशासनाने समाधानकारक तोडगा काढला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडेल. पहिली उचल ४,५०० रुपये मिळालीच पाहिजे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची मोटारसायकल जनजागृती रॅली काढण्यात आली. दिवसभरात तब्बल १८५ किलोमीटरचा टप्पा पार करणाऱ्या या रॅलीने संपूर्ण जिल्हा ढवळून काढला.

हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. यामध्ये हजारो शेतकरी दुचाकीसह, हातात संघटनेचे झेंडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.ही रॅली हातकणंगले येथून सुरू होऊन कुंभोज, नरंदे, सावर्डे, वडगाव, वाठार, वारणानगर, वाघबीळ, आसुर्ले पोर्ले, खुपिरे, सांगरूळ, सडोली खालसा, परिते, बिद्री, वाळवे, सिद्धनेर्ली आणि कागल या प्रमुख गावांमधून मार्गस्थ झाली. कसबा सांगाव येथे या रॅलीची सांगता झाली.

ऊस म्हणजे चुरमुरे नव्हेत...

कोपार्डे : ऊस म्हणजे चुरमुरे नव्हेत. ऊस दर निश्चित न करता उसाला हात लावण्याचा प्रयत्न केल्यास सरकारच्या छाताडावर बसू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ही मोटारसायकल रॅली कुंभी कारखान्यावरून भोगावती कारखान्याकडे रवाना झाली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, धनाजी पाटील, सचिन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

.. तर आंदोलन तीव्र करू

कसबा सांगाव : दुष्काळाचे संकट दाखवून धरणे भरली असताना सुद्धा नद्या कोरड्या ठेवून भारनियमन करून शेतकऱ्यांना धारेवर धरत ऊस दराचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन तीव्र करू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. कसबा सांगाव (ता. कागल) येथील चावडी चौकात रॅलीच्या सांगता सभेत ते बोलत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT