Sun Halo Kolhapur | कोल्हापुरात सूर्याभोवती दिसले कडे 
कोल्हापूर

Sun Halo Kolhapur | कोल्हापुरात सूर्याभोवती दिसले कडे

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुपारच्या सुमारास आकाशात अद्‌भुत दृश्य पाहायला मिळाले. सूर्याभोवती मोठ्या आकाराचे रंगीत गोलाकार वलय तयार झाले होते. सूर्याभोवती दुर्मीळ आणि नयनरम्य कडे तयार झाल्याने नागरिकांचे या घटनेकडे लक्ष वेधले गेले. वातावरणातील या नैसर्गिक घटनेला ‘सन हॅलो’ किंवा ‘२२ अंशांचे हॅलो,’ असे म्हटले जाते.

कोल्हापुरात सध्या मान्सून सक्रिय होण्याच्या पार्श्वभूमीवर वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता असून उंच स्तरावर सिरोस्ट्रॅटस ढगांची निर्मिती झाली आहे. या ढगांतील बर्फकणांवर सूर्यकिरणांचे अपवर्तन झाल्याने हे वलय दिसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सूर्याभोवती रंगीत वलय दिसताच अनेक नागरिकांनी मोबाईलमध्ये त्याचे फोटो आणि व्हिडीओ टिपले. काही मिनिटांतच हे फोटो व व्हिडीओ व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. हे नेमके काय आहे? इंद्रधनुष्य की वेगळी घटना? अशा चर्चांना दिवसभर सोशल मीडियावर उधाण आले.

...यामुळे तयार होतो ‘सन हॅलो’

‘सन हॅलो’ ही पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिक घटना असून ती वातावरणातील उंच स्तरावर असलेल्या सिरोस्ट्रॅटस ढगांमधील सूक्ष्म षटकोनी बर्फकणांमधून सूर्यप्रकाशाचे अपवर्तन झाल्यामुळे तयार होते. या प्रक्रियेमुळे सूर्याभोवती सुमारे २२ अंश त्रिज्येचे वर्तुळाकार वलय दिसते. वलयाच्या आतील बाजूस लालसर, तर बाहेरील भागात निळसर छटा दिसू शकतात. आकाशात उंचावर बर्फकणयुक्त ढग असल्यास ही घटना स्पष्टपणे पाहायला मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT