कोगनोळी/कागल : ऊसदरासह विविध मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत दिल्ली येथे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील उड्डाणपुलाजवळ शेतकऱ्यांनी बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आंदोलनस्थळी शेतकरी संघटनेचे झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आंदोलनस्थळी येताच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘कोण म्हणतोय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. मंगळवारी सकाळपासूनच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी टोल नाक्यानजीक उड्डाणपुलाजवळ गर्दी सुरु केली. यावेळी महामार्ग अडवून धरण्यात आला. कोगनोळीसह परिसरात ऊस आंदोलनाची तीव्रता अधिक जाणवत होती. या आंदोलनाचा फटका अनेक प्रवाशांना बसला. शाळेतून परतणार्या विद्यार्थ्यांचीही गैरसोय झाली.
कोगनोळी उड्डाणपुलाजवळ चक्काजाम आंदोलन सुरू झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर सुरू केला. बेळगावकडे जाणाऱ्या प्रवासी व अवजड वाहने पिंपळगाव-सिद्धनेर्लीमार्गे नदीकिनाऱ्याच्या रस्त्याने बेळगावकडे पाठवली जात होती. लक्ष्मी टेकडी परिसरातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांसाठी एमआयडीसी, हुपरी-येळगुळ मार्गाचा वापर सुरू होता. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत झाली.
सोलापुरातही शेतकरी आक्रमक
उसदरासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी दुपारी सोलापूर-पुणे महामार्गावरील भीमानगर (ता. माढा) येथे सुमारे अडीच-तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्या
साखरेचा किमान हमीभाव प्रतिकिलो ५० रुपये करावा.
‘सी-हेव्ही’ इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा.
हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे प्रतिटन ५०० रुपये अनुदान मिळावे.