विकास कांबळे
कोल्हापूर : चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरू होऊन दहा दिवस उलटले, तरी कोल्हापूर विभागातील 16 साखर कारखान्यांनी अद्याप आपले दर जाहीर केलेले नाहीत. दर जाहीर न करणार्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कारखाने आहेत. त्यात एका खासगी कारखान्याचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्याप आपला दर जाहीर केलेला नाही. ऊस दर जाहीर न केलेल्या कारखान्यांना साखर सहसंचालकांनी दर जाहीर करण्याबाबत पत्र पाठविले आहे.
पहिल्या दहा दिवसांमध्ये उतार्यात (12.84) जिल्ह्यात इचलकरंजीतील देशभक्त रत्नाप्पा अण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना, तर सांगली जिल्ह्यात पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नाईकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी कारखाना, वाळवा हा कारखाना उतार्यात (12.72) आघाडीवर आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात कमी उतारा (11.31) आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना, तर सांगली जिल्ह्यात सर्वात कमी उतारा (10.18) रायगाव शुगर लि. (ता. कडेगाव) या साखर कारखान्याचा आहे.
कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील 40 साखर कारखाने आहेत. यावर्षीचा गळीत हंगाम दि. 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात पडणारा अवेळी पाऊस, दराबाबत शेतकरी संघटनांनी सुरू केलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर हंगाम वेळेत सुरू होण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, साखर कारखान्यांनी अगोदरच सर्व नियोजन करून ठेवल्यामुळे आणि पावसाने दिलासा दिल्यामुळे कोल्हापूर विभागातील बहुतांशी सर्व कारखाने सुरू झाले आहेत.
कोल्हापूर विभागातील सर्व कारखाने सुरू झाले असले, तरी जवळपास निम्यापेक्षा अधिक कारखान्यांनी ऊस दरच जाहीर केलेला नाही. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचा समावेश आहे. याउलट दर जाहीर करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील 23 कारखान्यांपैकी 5 साखर कारखान्यांनी अद्याप आपले दर जाहीर केलेले नाहीत. 17 साखर कारखान्यांनी आपले दर जाहीर केले आहेत. त्यामध्ये भोगावती सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. या कारखान्याने प्रतिटन 3 हजार 652 रुपये इतका दर जाहीर केला आहे. ऊस दर जाहीर न केलेल्या कारखान्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील 14 कारखान्यांचा, तर कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ दोन कारखान्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्व कारखान्यांनी दि. 12 नोव्हेंबरपर्यंत ऊस दर जाहीर करण्याचे ठरले होते. परंतु, सांगली जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेले नाहीत. यासंदर्भात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. तरी आपण ऊस दर लवकर जाहीर करावेत. शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे कायदा व मुख्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्याची जबाबदारी आपल्यावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी साखर कारखान्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.