आशिष शिंदे
कोल्हापूर : केवळ दुपारीच नव्हे तर रात्रीही कोल्हापुरात उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यंदाच्या मे महिन्यात (दि. 11), (दि. 13), (दि. 18) आणि दि.19 मे ची रात्र सर्वात उष्ण रात्र ठरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चारही दिवशी किमान तापमान तब्बल 25.5 अंशांच्या पुढे होते. वाढलेली सापेक्ष आर्द्रता आणि किमान तापमानातील उसळीमुळे कोल्हापुरात उष्णकटिबंधीय रात्री (ट्रॉपिकल नाईटस्) चा धोका गडद झाला आहे.
हवामान विभागाकडून 1969 पासून प्रत्येक महिन्यातील हवामानविषयक टोकाच्या नोंदी म्हणजेच ‘क्लायमेटोलॉजिकल एक्सट्रिम्स’ ठेवल्या जातात. या नोंदींचा अभ्यास केला असता, कोल्हापूरच्या हवामानात होत असलेला बदल स्पष्टपणे समोर येतो. मे महिन्यातील सर्वोच्च किमान तापमानाच्या आजवरच्या 11 मुख्य नोंदींपैकी सर्वच्या सर्व नोंदी 2016, 2018, 2019, 2020, 2021, 2023, 2024 आणि यंदाच्या 2026 या वर्षांतीलच आहेत. या 11 सर्वोच्च नोंदींपैकी तीन नोंदी एकट्या 2024 मधील आहेत, तर तब्बल चार नोंदी यंदाच्या वर्षातील आहेत. यावरून कोल्हापुरात उष्ण रात्रींचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते.