कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याला वादळी वारा, पावसाने शनिवारी सायंकाळी झोडपून काढले. इचलकरंजी शहराला पावसाने तडाखा दिला. शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड तालुक्यात पावसाने नुकसान झाले.
इचलकरंजीत घरांचे पत्रे उडाले, झाडे पडली
इचलकरंजी : इचलकरंजी शहराला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले. वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे जागोजागी वाहतूक खोळंबली. काही ठिकाणी घरे व दुकानांचे पत्रे उडून गेले. काही ठिकाणी प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले.
दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
सोसाट्याच्या वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. यामुळे वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी फांद्या घरांवर, दुकानांवर पडल्याने मोठे नुकसान झाले. शहरातील मुख्य मार्गावरील डिजिटल फलकही रस्त्यावर पडले. झाडे विद्युतवाहिनीवर पडल्यामुळे शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता.
यड्राव : येथे पावसासह गारपीट झाली. अनेक ठिकाणच्या भिंती पडल्या. झाडे, विद्युत खांब पडले. ऊस मजुरांच्या झोपड्यांत पाणी शिरले. प्राथमिक शाळेसमोरील उसमान पाथरवट, राजू मुल्ला यांच्या घरावरील पत्रे उडाली. समोर असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या उद्ध्वस्त झाल्या.
पार्वती औद्योगिक वसाहतीकडे जाणार्या बेघर वसाहत मार्गावरील दोन झाडे उन्मळून पडली. तेजस टेक्स्टाईल, संतोष पाटील, सिद्धार्थ मिल्क या कारखान्यांच्या कंपाऊंडच्या भिंती पडल्या. यड्राव जांभळी मार्गावर झाड उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प होती.
कुंभोज: हातकणंगले तालुक्यातील कुंभोजसह हिंगणगाव, दुर्गेवाडी, नेज, शिवपुरी, बाहुबली, मजले व नरंदे आदी परिसरात विजांच्या गडगडाटांसह पाऊस झाला. कुंभोज परिसरातील काही घरांचे पत्रे उडाले. पावसाने ज्वारी व आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
खोची: खोची, भेंडवडे, बुवाचे वठार परिसराला गारांसह पावसाने तडाखा दिला. अनेक घरांचे, जनावरांच्या शेडाचे पत्रे उडाले. पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निवारा शेडचेही पत्रे उडून गेले. खोची-बुवाचे वठार, खोची-भेंडवडे, नरंदे-बुवाचे वठार रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
झाडाच्या फांद्या पडल्यामुळे हे दोन्ही मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी काही काळ बंद झाले होते. पावसामुळे कलिंगड, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा पिकांची काढणी, मळणी अडचणीत आली आहे.
हुपरी : हुपरी परिसरात वादळी पावसाने आठवडी बाज़ारात नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. जोरदार वार्यांमुळे धुळीचे लोट पसरले होते. काही ठिकाणी झाले, तसेच काही घरांचे पत्रे व कौले उडाली.
तारदाळ : तारदाळ-खोतवाडी परिसरात अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. विद्युत वाहिन्या तुडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.
जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथे पावसाने घरांची पडझड झाली. अनेक घरावरील छत उडाले. दिलीप खाडे यांच्या घराचे छत पूर्णपणे कोसळल्याने त्यांचे माठे नुकसान झाले.
कागल : शहर व परिसरास पावसाने झोडपून काढले. पावसानेे ऊस तोडणीचे काम खोळंबले. नागरिकांची वैरण, तसेच इतर साहित्य झाकून ठेवण्यासाठी गडबड उडाली होती. मजुरांचे हाल झाले.
माद्याळ : चिकोत्रा खोरे परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटांसह सायंकाळी उशिरा वळीव पावसाने हजेरी लावली.
आजरा: तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात वादळी वारा व विजेच्या कडकडाटांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. आजरा शहरासह तालुक्याच्या इतर भागात पाऊस रिमझिम बरसला. वाटंगी-शिरसंगी, गवसे परिसरात जोरदार पाऊस झाला. पेरणोली, भादवण व उत्तूर परिसरात रिमझिम सरी बरसल्या.
गडहिंग्लज: गडहिंग्लज शहरासह तालुक्याच्या काही भागात शनिवारी सायंकाळी जोरदार वळीव बरसला. सुमारे अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर हवेत गारवा पसरला होता.
गारगोटी : भुदरगड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. सायंकाळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे पंधरा मिनिटे पाऊस झाला. तालुक्याच्या बहुतांशी भागात पाऊस झाला. टिक्केवाडी येथेही पावसाने हजेरी लावल्याने ग्रामस्थांची चांगलीच गैरसोय झाली. पालात पाणी शिरल्यामुळे मोठी अडचण झाली. काजु व आंबा पिकांचे नुकसान झाले.
कडगाव : परिसरात जोरदार वार्यासह वळीव पावसाने हजेरी लावली. या पावसाने वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले.
निगवेे खालसा : परिसरात आज सायंकाळी पावणेपाच ते साडेसहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडला. यामुळे ऊस पिकाला दिलासा मिळणार आहे.
जयसिंगपूर: शनिवारी शिरोळ तालुक्यातील काही गावांमध्ये झालेल्या वादळी पावसाचा फटका शेतकर्यांना बसला आहे. या पावसाने नागरिक व शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानींचे पंचनामे तातडीने करा, असे आदेश आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तहसीलदार यांना दिले. तालुक्यातील अब्दुललाट, लाटवाडी, यड्राव, टाकवडे, जांभळी, हरोली, दानोळी, कवठेसार, तमदलगे आदी गावांना याचा फटका बसला आहे.