कोल्हापूर ः राजेंद्रनगर परिसरातील साळोखे पार्कमधील भारतनगर येथे बुधवारी (दि. 15) पहाटे घडलेल्या घटनेने शहर हादरले. आईने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे सावत्र मुलाने वरवंट्याने ठेचून आईचा निर्घृण खून केला. सावित्रीबाई अरुण निकम (वय 53) असे मृत महिलेचे नाव असून, मुलगा विजय अरुण निकम (35) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
सावित्रीबाई आणि विजय दोघेच घरी राहत होते. सावित्रीबाई महाद्वार रोडवर किरकोळ साहित्य विकून घर चालवत होत्या. मुलगा विजय सेंट्रिंगचे काम करीत होता; पण दारूच्या व्यसनामुळे तो कामापासून दूर गेला. तो आईकडे नेहमीच दारूसाठी पैसे मागायचा. पैसे मिळाले नाहीत तर मारहाण करायचा.
बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास दोघांमध्ये पैशावरून वाद झाला आणि रागाच्या भरात विजयने वरवंटा उचलून आईच्या डोक्यावर जबर प्रहार केला. आई रक्ताच्या थारोळ्यात पडली. वरवंट्याच्या प्रहाराने डोक्याचा चेंदामेदा झाला. रक्ताचा पाट घराच्या उंबर्यापर्यंत आला होता.
घटनेनंतर विजयने स्वतःच फोन करून इस्पुर्लीतील बहिणीला आईचा खून केल्याचे सांगितले. शेजार्यांनाही त्याने आईच्या डोक्यात वरवंटा घातल्याचे सांगितल्यावर सर्व परिसर हादरला. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. राजारामपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने विजयला तातडीने ताब्यात घेतले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या भीषण कृत्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विजयचा विवाह झाला असला, तरी त्याने पत्नीवरही अत्याचार केले. त्यामुळे पत्नी दोन मुलींना घेऊन माहेरी गेली आणि त्यानंतर आईच त्याची सावली बनली; पण त्या सावलीलाच आज त्याने कायमचे संपवले.
घटनास्थळी शेजारच्या महिला रडत होत्या. कशी काय एवढी निर्दयता आली त्याच्या मनात? असा प्रश्न त्यांच्या नजरेत होता. विजयची बहीण घटनास्थळी पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यांत फक्त अश्रू होते. ती म्हणाली, तो आईला नेहमी मारायचा... पण ती सहन करत राहिली. तो खून करेल, असे कधी वाटलेच नाही.खून