कोल्हापूर : नाट्यस्पर्धेत सोमवारी सादर झालेल्या ‌‘भांडा सौख्य भरे‌’ या नाटकातील एका प्रसंगात अभिनेते राजन जोशी आणि अश्विनी कांबळे. (छाया ः अर्जुन टाकळकर) ARJUNDTAKALKAR10
कोल्हापूर

Kolhapur News| विनोदी कारुण्याची चुटपूट : भांडा सौख्य भरे

सहज सोपा अभिनय, प्रभावी संवादफेक यामुळे रसिकमनाला नाटकाने खेळवत ठेवले

पुढारी वृत्तसेवा

- अर्चना माने-भोसले

कोल्हापूर : नवरा-बायकोचे नाते म्हणजे एक न उलगडणारे कोडे. कधी सहज आनंद देणारे तर कधी अपरिहार्यतेतून गुंतवून ठेवणारे. या नात्यात प्रेम, माया, जिव्हाळा, काळजी जितकी; तितकीच राग, संशय, नाराजी, कुरघोडीही! नवरा-बायकोच्या संसाराला गोणपाटाची शर्यत म्हणतात ते याचसाठी! वाढत्या वयाबरोबर स्वत:ला सावरता सावरता एकमेकांना कधी सावरू लागतात हे दोघांनाही कळत नाही आणि म्हणून या नात्याच्या छटा जितक्या उथळ तितक्याच त्या गहिऱ्याही! नेमका हाच धागा पकडून भांडा सौख्य भरे हे नाटक खुलत जाते. जाणीव चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीने सादर झालेले 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या या नाटकाने रसिकमनाची पकड घेतली.

दोन भिन्न व्यक्तिमत्त्वाचा स्वभाव, त्यांचा संवाद आणि एकमेकांना जुळवून घेण्याची कसरत यातून या नाटकाला विनोदाचा साज चढत जातो. संवेदनशील लेखक असणारा ‌‘श्री‌’ आणि एक सामान्य मात्र रागीट गृहिणी असणारी ‌‘सौ‌’ अर्थात लता यांचा पंचवीस-एक वर्षांचा संसार म्हणजे मतभेद, वादविवाद आणि तडजोड यांचा जणू परिपाठ असतो. नाटकात हा परिपाठ विनोदाने उलगडत जातो. दोघांमधला संवाद, कोट्या आणि कुरघोडीतून हा विनोद प्रेक्षकांना भरपूर हसवतो. विपुल देशमुख यांची ओघवती नाट्यसंहिता आणि राजन जोशी, अश्विनी कांबळे या कलाकारांचा तितकाच सहज सोपा अभिनय, प्रभावी संवादफेक ही या नाटकाची जमेची बाजू आहे.

संसाराच्या रहाटगाड्यातील व्यक्ती, प्रसंग, जबाबदाऱ्या, कसरती या सर्वांची विनोदी शैलीत केलेली मांडणी लक्षणीय. सासरच्या नातेवाईकांचा तऱ्हेवाईकपणा, सासूबाईची लेकीला असणारी शिकवण, बायकोची सततची कटकट आणि मोबाईलचे भूत व संशयी वृत्ती आणि पुन्हा संसाराची असणारी अपरिहार्यता या सर्वांनी बेजार झालेला, मात्र संवेदनशील लेखक असलेला ‌‘तो‌’ राजन जोशी यांनी उत्तम वठवला आहे; तर आळशी, बेजबादार आणि व्यसनी असलेल्या लेखक नवऱ्याबरोबर मनोभावे संसार करणारी ‌‘ती‌’ अश्विनी कांबळे यांनी छान सादर केली आहे. पन्नाशीत असलेल्या जोडप्याचे जगणे या नाटकात उत्तम व्यक्त झाले आहे.

पहिल्या अंकात विनोदाचे संवाद ठासून भरलेला असताना ‌‘सत्य पचवणे अवघड असते‌’ किंवा मग ‌‘बाबा स्वत:ला सांभाळ‌’ या संवादाच्या वेळी लेखकाचा अभिनय क्षणिक गंभीर आणि गहिरा होतो. तशी प्रकाशयोजनाही नकळत बदलते. हा सूक्ष्म बदल प्रेक्षकांच्या लक्षात येतो ना येतो तोच पुढच्याच क्षणी हास्याचा प्रवाह कायम राखला जातो. पहिल्या अंकाच्या नाट्य अवकाशात घडलेली ही बाब काहीशी विसंगत वाटते. मात्र याचा उलगडा दुसऱ्या अंकाच्या शेवटी होतो. दिग्दर्शकाचे हे धक्कातंत्र अप्रतिम! नकळत ॲम्ब्युलन्सचा आलेला आवाज आणि स्वप्नातून जागा झालेला लेखक यानंतर संपूर्ण नाट्याचा काळ आणि अवकाश पालटून जातो. लताची लेखकाच्या जगण्यात झालेल्या अडगळीवर आतापर्यंत खळखळून हसलेला प्रेक्षक लेखकाच्या आयुष्यात लताचे नसण्याचे वास्तव स्वीकारताना मात्र चुटपुटत नाट्यगृहाबाहेर पडतो. सोबत आपल्या जोडीदाराबाबत अंतर्मुखही होतो.

फिश पॉटमधला एकटा मासा आणि लेखक यांचा शेवटचा प्रसंग लताच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीबाबत खूप काही सांगतो. नवरा-बायकोच्या सहजीवनातल्या विनोदाच्या कोपरखळ्या आणि जोडीदाराला गमावलेल्या कारुण्याची ही चुटपूट कमालीची यशस्वी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT