Kolhapur startups | कोल्हापुरी स्टार्टअप्सची उलाढाल 150 कोटींवर file photo
कोल्हापूर

Kolhapur startups | कोल्हापुरी स्टार्टअप्सची उलाढाल 150 कोटींवर

कोल्हापूरचे तरुण करताहेत भारताचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृषी, ड्रोन टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी, डिझाईन थिंकिंग, क्लिनिकल रिसर्च अशा विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्समुळे भारत आज जागतिकस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या स्टार्टअप्सच्या विश्वात भारताने उत्तुंग भरारी घेत स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत देशभरात आजवर 2 लाख सरकारी मान्यताप्राप्त स्टार्टअप्सचा ऐतिहासिक टप्पा पार केला. एका वर्षात तब्बल 44 हजारांहून अधिक नवीन स्टार्टअप्सची नोंद झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यामध्ये कोल्हापुरातील 285 स्टार्टअप्सचा समावेश असून, त्यांची वार्षिक उलाढाल तब्बल 150 कोटींच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे, जगभरात भारतीय स्टार्टअप्सचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविण्यात येणार्‍या शिष्टमंडळात (डेलिगेशन) कोल्हापूरच्या सचिन कुंभोज व अंजोरी कुंभोज यांचा समावेश आहे.

देशभरातील 2 लाख स्टार्टअप्समुळे 21 लाखांहून अधिक थेट

रोजगारनिर्मिती झाली असून, उल्लेखनीय बाब म्हणजे, या स्टार्टअप्सपैकी 48 टक्के स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक किंवा भागीदार आहे. स्टार्टअप्सच्या विश्वात कोल्हापूरचा वाटादेखील उल्लेखनीय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच, देशात सर्वाधिक 35 हजार स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत. यानंतर गुजरात व उत्तर प्रदेशचा नंबर लागतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

स्टार्टअप्सचा हा आकडा केवळ उद्योगवाढ दर्शवत नाही, तर भारतात आकाराला येत असलेल्या स्टार्टअप संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. उद्योजकता ही केवळ कंपन्या उभारण्यापुरती मर्यादित न राहता कुटुंबांचे, भविष्याचे आणि अर्थव्यवस्थेचे जीवनमान उंचावणारी चळवळ ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

नवोन्मेषाच्या बाबतीतही भारतीय स्टार्टअप्सनी ठसा उमटवला आहे. आतापर्यंत 16,400 हून अधिक पेटंट अर्ज दाखल झाले असून, 34,800 पेक्षा अधिक स्टार्टअप्सना सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम) प्लॅटफॉर्मवर सामावून घेण्यात आले आहे. यामुळे स्टार्टअप्सना थेट शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळत आहे.

कोल्हापूरकर करताहेत भारतीय स्टार्टअप्सचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व

जगभरातील अनेक स्टार्टअप्सना भारतात गुंतवणूक करायची असते. अशा स्टार्टअप्सना माहिती देण्यासाठी केंद्र सरकाकडून शिष्टमंडळ (डेलिगेशन) पाठवले जाते. या शिष्टमंडळात कोल्हापूरच्या सचिन कुंभोज व अंजोरी कुंभोज यांचा समावेश आहे. 2022 मध्ये क्रोएशिया येथे, 2023 मध्ये फिनलँड, 2024 साली दुबईमध्ये व यंदा भुतानमध्ये ते भारतीय स्टार्टअप्सचे प्रतिनिधित्व करत माहिती देणार आहेत.

स्टार्टअप्समध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय

भारतातील स्टार्टअप चळवळ केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवत आहे. देशातील 2 लाख सरकारी मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी तब्बल 48 टक्के स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक किंवा भागीदार आहे. एआय, कृषी, हेल्थटेक, क्लिनिकल रिसर्च, डिझाईन थिंकिंग आणि सायबर सिक्युरिटीसारख्या क्षेत्रांत महिलांचा वाढता सहभाग दिसून येत असून, नेतृत्व, निर्णय प्रक्रिया आणि नवोन्मेषात महिलांची भूमिका बळकट होत असल्याचे चित्र आहे.

1,350 स्टार्टअप्समध्ये 25,320 कोटींची गुंतवणूक

स्टार्टअप्सना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने उभारलेली आर्थिक यंत्रणाही तितकीच प्रभावी ठरत आहे. ‘फंड ऑफ फंडस् फॉर स्टार्टअप्स’अंतर्गत 1,350 हून अधिक स्टार्टअप्समध्ये 25,320 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय, ‘क्रेडिट गॅरंटी स्कीम’अंतर्गत 775 कोटी रुपयांचे पाठबळ देण्यात आले असून, ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम’मधून 3,200 हून अधिक अर्जांसाठी 585 कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT