कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने केलेल्या विशेष नियोजनाला मोठे यश मिळाले आहे. 2 ते 8 जुलै या आठ दिवसांच्या कालावधीत विभागाच्या बसगाड्यांनी तब्बल 2 लाख 19 हजार 821 किलोमीटरचा प्रवास करत 1 कोटी 92 लाख 173 रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. या उल्लेखनीय सेवेमुळे हजारो वारकर्यांचा पंढरपूर प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली.
चालक-वाहकांची पुरेशी उपलब्धता, गाड्यांची तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेची दक्षता यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. प्रवाशांच्या सोयीसाठी वेळापत्रकात बदल करून अतिरिक्त गाड्यांची सोय केल्याने हजारो वारकर्यांना वेळेत आणि सुरक्षितपणे पंढरपूरची वारी करता आली. विभागातील सर्वच आगारांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे बोगरे यांनी नमूद केले.