कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ म्हणजे धगधगते अग्निकुंडच आहे. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यासाठी हा मतदारसंघ म्हणजे वर्चस्वाची लढाई आहे. पाटील यांचे पुतणे ऋतुराज येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार असून ते पुन्हा रिंगणात आहेत. त्यांची लढत भाजपचे माजी आमदार आणि महाडिक यांचे चुलत भाऊ अमल यांच्याशी आहे. परस्परांवर टीका करताना कौटुंबिक आरोपांची राळ उडाली आहे.
मतदारसंघाच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात सामना झाला. पाटील यांनी महादेवराव महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले होते. विजय आपलाच होणार, काकांनी पुतण्याचा बळी देऊ नये, अशी टॅगलाईन त्यांनी पॉप्युलर केली होती. या निवडणुकीत सतेज पाटील विजयी झाले आणि नंतर राज्यमंत्रिमंडळात त्यांचा गृह राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत सतेज पाटील 5 हजार 767 मताधिक्याने विजयी झाले होते. यावरून चुरशीची कल्पना येते.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. सतेज पाटील हे काँग्रेसचे मंत्री असल्याने त्यांच्यावर पक्षाचे बंधन होते. कार्यकर्त्यांचा विरोध मोडून महाडिक यांचा प्रचार करण्याचे आदेश त्यांनी दिले. महाडिक निवडून आले. लगेच चार महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी पाटील यांना विरोध करण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत महाडिक यांचा प्रचार केल्याने विधानसभा निवडणुकीत पाटील यांना महाडिक यांच्याकडून सहकार्य अपेक्षित होते. मात्र, महादेवराव महाडिक यांनी आपले चिरंजीव अमल यांना भाजपच्या तिकिटावर उभे केले. भाजपची लाट, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा याचा फायदा त्यांना झाला आणि गृह राज्यमंत्री असलेले सतेज पाटील पराभूत झाले. अमल महाडिक 8 हजार 528 मतांनी विजयी झाले. या जिव्हारी लागलेल्या पराभवाचा वचपा पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काढला. काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारून त्यांनी राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्याविरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक यांना आमचं ठरलंय, या टॅगलाईनखाली पाठिंबा दिला. महाडिक यांना पराभूत करून त्यांनी अर्धा वचपा काढला. उर्वरित काम 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले पुतणे ऋतुराज पाटील यांना काँग्रेसच्या तिकिटावर विजय करून तत्कालीन आमदार अमल महाडिक यांना पराभूत केले.
आता पुन्हा एकदा ऋतुराज आणि अमल हे काँग्रेस व भाजपच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. सतेज पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. शून्यावरून चार आमदारांपर्यंत काँग्रेसला यश देणार्या पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे, तर राज्यसभेवरील विजयानंतर आक्रमक झालेल्या महाडिक यांनीही सर्व ताकद आखाड्यात उतरवली आहे.