विशाळगड : बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : अरुणाचल प्रदेशात चीन सीमेवर रस्ता दुरुस्तीचे काम करत असताना डोजर दरीत कोसळून जवान शहीद झाला. सॅपर सुनील विठ्ठल गुजर (वय २७) (Sunil Gujar) असे या शहीद जवानाचे नाव आहे. ते मूळचे शित्तूर तर्फ मलकापूर ( ता. शाहूवाडी) येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. (Kolhapur News)
सुनील विठ्ठल गुजर हे भारतीय सैन्य दलात २०१९ मध्ये भरती झाले होते. पुणे येथे बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे ११० इंजिनियर रेजिमेंट बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये सेवा बजावत होते. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना ते डोजर ऑपरेटर म्हणून काम करत होते. १३ मार्च रोजी दुपारी चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यांचा डोजर घसरून ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत सुनील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सुनील यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण गावातच झाले. २०२३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई लक्ष्मी, वडील विट्ठल, पत्नी स्वप्नाली, पाच महिन्यांचा मुलगा शिवांश, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. सुनील हे एक कर्तव्यदक्ष जवान होते. देशाच्या रक्षणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या निधनाने देशाने एक शूरवीर जवान गमावला आहे.
शहीद सुनील गुजर यांचे पार्थिव आज (१४ मार्च) संध्याकाळपर्यंत अरुणाचल प्रदेशातील दिब्रुगड येथे आणले जाईल. त्यानंतर, त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, शित्तूर तर्फ मलकापूर येथे आणले जाईल. शहीद जवानाचे पार्थिव उद्या (१५ मार्च) संध्याकाळपर्यंत त्यांच्या गावी पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.
सुनील यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच, गावावर शोककळा पसरली आहे. शहीद जवानाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाच महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चिमुकल्या शिवांशवर जन्मतःच पितृछत्र हरपले आहे. कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगा झाला. याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. सुनील यांना आपल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही.