नागाव : शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक परिसरात लागलेल्या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली, तर झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या ड्रीप पाईप जळाल्या. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. या आगीची पक्ष्यांच्या घरट्यांनाही झळ बसली असून यामध्ये घरटी जळून यात असणारी अंडी व पिलेही मृत्युमुखी पडली आहेत.
शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक परिसरात शेकडो झाडे लावण्यात आली होती. या साठी लाखो खर्च करण्यात आला होता. स्मॅकजवळ शिरोली गावातून निघणारा कचरा डेपो ग््राामपंचायतीने केला आहे. कचऱ्याला लागलेली आग या परिसराला लागली. या आगीने रौद्ररूप धारण करून स्मॅकच्या वतीने लावलेल्या झाडांना वेढले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी असलेला कचरा डेपो तत्काळ हटवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शिरोलीतील घनकचरा प्रकल्पासाठी वीट भट्टीच्या माळावरील चार गुंठे जागा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंजूर झाली आहे. हा प्रकल्प तत्काळ सुरू करण्यासाठी 27 लाखांच्या कामाची निविदाही निघाली आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी व भविष्यातील कचऱ्याचा विचार करता आणखी सहा गुंठे जागेची आवश्यकता आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे उर्वरित जागेची मागणी करणार आहे.गीता कोळी, ग्रा. पं. अधिकारी, शिरोली पुलाची