मातेचे निधन; विरह सहन न झाल्याने भावंडांनी जीवन संपवले  file photo
कोल्हापूर

ह्रदयद्रावक... मातेच्या निधनानंतर संपत्ती दान करून भावा-बहिणीने जीवन संपवले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : वयोवृद्ध आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने संभाजीनगर येथील उच्चशिक्षित अविवाहित भावंडांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावात उडी टाकून जीवन संपवले. गुरुवारी (दि. 15) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय 61) व अ‍ॅड. भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (57, रा. नाळे कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत. कस्टम व जीएसटी विभागात अधीक्षकपदावरून निवृत्त झालेल्या अधिकार्‍याने, विविध शाखेतून 22 पदव्या संपादन केलेल्या आपल्या भगिनीसह जीवनाचा शेवट करून घेतल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या भावंडांनी आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता कोल्हापूर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील काही गरजू व सेवाभावी, धर्मादाय संस्थांना दान केल्याचेही सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्याची तपशीलवार माहितीही त्यांनी दिला आहे.

आईशिवाय जगू शकत नाही... चाललो आईकडे !

सुसाईड नोटमध्ये दुर्दैवी बहीण-भावांनी म्हटले आहे की, अत्यंत कष्टमय आणि हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जाऊन आम्हा भावंडांचा सांभाळ केलेली आई पद्मजा नीळकंठ कुलकर्णी (वय 86) यांचा 24 मे 2024 रोजी मृत्यू झाला. आई ही आमच्या जीवनातील सर्वोच्च स्थान असल्याने तिच्या पश्चात आपण राहू शकत नाही. तिच्या मृत्यूचा विरह आम्ही सहन करू शकत नाही. आम्ही भावंडेही एकाचवेळी आईकडे जात आहोत. आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये.

संभाजीनगर, नाळे कॉलनी, साळोखेनगरात शोककळा

आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने उच्च विद्याभूषित भावंडांनी राजाराम तलावात उडी टाकून जीवन संपवल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच संभाजीनगर, नाळे कॉलनीसह साळोखेनगर परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळासह शासकीय रुग्णालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली. गुरुवारी रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. कुलकर्णी यांच्याशी संबंधित असलेले अमोल निरगुंडे ( रा. राजारामपुरी) यांनी भूषण व अ‍ॅड. भाग्यश्री यांचे मृतदेह ताब्यात घेऊन पंचगंगा अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. मूळचे कुटुंब कोते (राधानगरी) येथील भूषण व भाग्यश्री कुलकर्णी या भावंडांचे मूळचे कुटुंब कोते (ता. राधानगरी) येथील होते. घरच्या गरिबीमुळे 40-45 वर्षांपूर्वी हे कुटुंब कोल्हापूरला स्थायिक झाले. वडिलांच्या निधनानंतर आई पद्मजा यांच्यावर दोन मुलांच्या शिक्षणासह पालनपोषण व घराची जबाबदारी येऊन पडली. काबाडकष्ट करून त्यांनी भूषण व भाग्यश्री यांचे शिक्षण पूर्ण केले.

भूषण... प्राध्यापक, वकिली, अधीक्षक पदावरही कार्यरत

भूषण यांनी प्रारंभी काही काळ प्राध्यापक, वकिली केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ जीएसटीमध्ये, त्यानंतर ते कस्टममध्ये वरिष्ठ पदावर दाखल झाले. दोन वर्षांपूर्वी अधीक्षक पदावरून निवृत्त झाले तर भाग्यश्री यांनी विविध शाखांमधून 22 पदव्या संपादन केल्या. शहरातील काही महाविद्यालयांत प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या. जिल्हा न्यायालयासह उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टातही त्यांनी वकिली केली. याशिवाय त्यांनी विविध विषयांवर लिखाणही केले आहे.

आईच्या स्मरणार्थ आदिवासींच्या घरासाठी केला खर्च

भूषण व भाग्यश्री यांनी सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील 15 आदिवासी कुटुंबीयांना आई पद्मजा यांच्या स्मरणार्थ घरे बांधून दिली. गोरगरीब मुलांच्या शिक्षणावर त्यांनी मोठा खर्च केला. सोलापूर जिल्ह्यात एका ठिकाणी मुलांसाठी हॉलही बांधून दिला. भूषण व अ‍ॅड. भाग्यश्री महिन्यापूर्वी नाळे कॉलनीतील फ्लॅटमधून साळोखेनगर येथे वास्तव्याला आले होते. आईच्या मृत्यूनंतर त्यांनी घरात स्वयंपाक करणेही बंद केले होते. वडापाव, मिसळ अशा पदार्थांवर त्यांची गुजराण सुरू होती. कोणाशी त्यांचा संपर्क नव्हता की कोणाकडे त्यांची ये-जा नव्हती.

भावंडांनी 14 ऑगस्टला जीवन संपवल्याचा संशय

आईच्या मृत्यूचा विरह सहन न झालेल्या भूषण आणि अ‍ॅड. भाग्यश्री यांनी बुधवारी (दि. 14) राजाराम तलावात जीवन संपवले असावे, असा संशय पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी व्यक्त केला. भावंडांनी एकमेकाच्या हाताला दोरी बांधून एकत्रित तलावात उडी टाकल्याचे दिसून येते. दोन्हीही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत. हाताला बांधलेल्या पर्समध्ये असलेली सुसाईड नोटही पोलिसांना आढळून आली आहे. सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील शेतकरी विजय महादेव दुर्गुळे (वय 38) हे जनावरांना घेऊन गुरुवारी (दि. 15) राजाराम तलाव परिसरात गेले होते. दोन्हीही मृतदेह पाण्यावर तरंगताना त्यांना आढळून आले. दुर्गुळे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT