कोल्हापूर : जगातील अत्यंत खडतर आणि सहनशक्तीची पराकाष्ठा पाहणार्या आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या सिद्धार्थ मंडलिक यांनी तिसर्यांदा यश खेचून आणत अनोखी हॅट्ट्रिक अगदी थाटात साजरी केली. यंदा न्यूझीलंडमधील कडाक्याच्या थंडीत, प्रतिकूल वातावरणात त्यांनी ही स्पर्धा 12 तास 37 मिनिटे व 56 सेकंद वेळेत पूर्ण केली. सिद्धार्थ यांनी यापूर्वी गोवा व त्यानंतर तैवानमधील आयर्नमॅन स्पर्धेतही यश मिळवले होते.
आयर्नमॅन स्पर्धेत 3.8 किलोमीटर्स समुद्रात पोहणे, 42.2 किलोमीटर्स धावणे आणि तब्बल 180 किलामीटर्स सायकलिंग असे खडतर टप्पे अत्यंत कमी वेळेत पार करावे लागतात. सिद्धार्थ यांनी समुद्रात पोहण्याचा टप्पा 1 तास 34 मिनिटांत, सायकलिंग 6 तास 32 मिनिटांत, तर धावण्याचा टप्पा 4 तास 8 मिनिटांत पूर्ण केला. ट्रान्झिशन टाईमसह त्यांनी ही स्पर्धा 12 तास 37 मिनिटे व 56 सेकंद वेळेत पूर्ण केली. सिद्धार्थ हे माजी कर्नल दिलीपसिंग मंडलिक यांचे चिरंजीव होत.
आयर्नमॅन स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खडतर स्पर्धा असून, यंदाच्या मोसमातही युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातील 2 हजारांहून अधिक स्पर्धक यात हिरीरीने सहभागी झाले होते. सिद्धार्थ यांच्या पत्नी पूजा या देखील जलतरणपटू असून, त्यांनी यापूर्वी अलिबाग ते गेटवे ऑफ इंडियाचे अंतर पोहून पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
प्रतिकूल वातावरण, तरीही...
न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे आयोजित या स्पर्धेदरम्यान तेथील तापमान 15-16 डिग्री सेल्सियसच्या आसपास होते. मुळातच हा प्रदेश कडाक्याच्या थंडीसाठी ओळखला जातो. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही सिद्धार्थ यांनी सर्वस्व पणास लावत ही स्पर्धा अगदी जिद्दीने पूर्ण केली.
आता लक्ष्य स्पेनमधील आयर्नमॅन स्पर्धेचे!
कोणत्याही प्रायोजकत्वाशिवाय आयर्नमॅन स्पर्धेत हॅट्ट्रिक साजरी करणार्या सिद्धार्थ यांनी यानंतर आता स्पेनमधील पुढील आयर्नमॅन स्पर्धेतही आणखी हिरीरीने सहभागी होण्याचा मानस याप्रसंगी व्यक्त केला आहे.