कोल्हापूर ः हिमोफिलिया आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असणारे फॅक्टर नऊ इंजेक्शनचा सीपीआर येथे गेल्या चार महिन्यांपासून पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे रुग्णांचे टेन्शन वाढले आहे. हिमोफिलियाच्या रुग्णांना हे इंजेक्शन घेण्यासाठी गोवा किंवा पुण्याला जावे लागते. सीपीआरमध्ये हिमोफिलियावर उपचार पूर्णतः मोफत आहेत. खासगी दवाखान्यात फॅक्टर आठ व नऊ इंजेक्शनची किंमत 20 हजार आहे. सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत.
सीपीआरमध्ये हिमोफिलियाचे 490 रुग्ण असून फॅक्टर आठचे 350 तर फॅक्टर नऊचे सुमारे 125 रुग्ण आहेत. हा आजार प्रामुख्याने अनुवंशिक असल्याने काळजी घ्यावी लागते. रक्त गोठणे ही प्रक्रिया या रुग्णात होत नाही. जखमेतून रक्त वाहत राहते. ते थांबत नाही. हा मूलतः पुरुषांचा अनुवंशिक आजार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कुटुंबातील 33 टक्के सदस्यांना हा आजार नसला तर तो पुढच्या पिढीत येण्याची शक्यता नाही. मात्र, अनेकदा म्युटेशनमुळे तसेच प्रोटिन्सच्या कमतरतेने हा आजार होतो. एकदा हा आजार झाला की, शेवटच्या श्वासापर्यंत संबंधित रुग्णांना फॅक्टरचे इंजेक्शन घ्यावेच लागले. शासकीय रुग्णालयात या आजारावर उपचार मोफत आहे. मात्र, फॅक्टर 8 व 9 चे इंजेक्शन वेळेत उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.