कोल्हापूर : अस्मिता काटकर हिच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू, सासरे यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. 
कोल्हापूर

Cyber Chowk Woman Death Case | मुलगा झाला नाही तर तुमच्या मुलीला संपवणार

जावयाने दिली होती सासू-सासऱ्यांना धमकी

पुढारी वृत्तसेवा

आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : ‘मुलगा झाला तरच मी तुला नांदवणार...’ यामुळे घाबरलेल्या अस्मिताने याची कल्पना आई-वडिलांना दिली. पती प्रतीकने मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासू-सासऱ्यांना धमकी देत ‘मी हाफ मर्डर केला असून कुणाला घाबरत नाही. मुलगा झाला नाही तर तुमच्या मुलीला ठार मारेन’, अशी धमकीच दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

मुलगा होणार याच अपेक्षेने खरेदी

अस्मिताला मुलगा झाल्यानंतर त्याला लल्ला म्हणून हाक मारणार या अपेक्षेनेच काटकर कुटुंबीयांनी आठव्या महिन्यातच मुलाच्या कपड्यांची खरेदी केली होती. नणंद ऋतुजानेही मुलाचे ऑनलाईनही कपडे खरेदी केले होते.

हुड्यांची भूकही संपेना

लग्नात ९ तोळे दागिने आणि ५ लाख रुपये, पहिल्या दिवाळीला ८१ हजार, अधिक महिन्यात ३५ हजारांचा चांदीचा दिवा, डोहाळे जेवणात ७७ हजार, पहिल्या प्रसूतीसाठी ६० हजार प्रतीकने घेतले. बारशासाठी ५२ हजारांचा पाळणा खरेदी करून ४० हजार रुपयेही सरदेसाई यांच्याकडून घेतले. ७७ हजार खर्चून डोहाळे जेवण केले. आता बारसे नंतर करू, अशी सरदेसाई यांची विनंती प्रतीकने धुडकावून लावत १५ ऑगस्टलाच थाटामाटात बारसे करण्याचा हट्ट धरला.

...नाहीतर मुलगीचे दुसरे लग्न करा

नातेवाईकांच्या लग्नात सोबत डान्स केला नाही म्हणून रोख पाच लाख रुपये, पाच तोळे सोने द्या, नाहीतर मुलगीचे दुसरे लग्न करा, अशी धमकी प्रतीकने दिली होती. तसेच फिरण्यासाठी गेल्यानंतर गोव्यातील वास्को येथे भर रस्त्यात सोडून गेला होता.

शुक्रवारी शेवटचा फोन

शुक्रवारी सायंकाळी अस्मिताने आई व भावाला शेवटचा फोन केला होता. १५ ऑगस्ट रोजी बारशाचा कार्यक्रम करू. मला त्रास होत आहे, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आत्महत्या करणार नाही, जास्तच त्रास झाला तर माहेरी निघून येईन. पण जमेल तितका संसार नेटाने करीन, अशी शपथ अस्मिताने दिली होती. बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतलेल्या अस्मिताने बँक आणि विमानतळावर काम केले आहे, मात्र लग्नानंतर तिच्यावर बंधने घालण्यत आली.

हा घातपातच, आरोपींना फाशी द्या! नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

अस्मिताच्या मृत्यूची बातमी समजताच तिची आई संगीता, भाऊ अनिकेत आणि नातेवाईकांनी रविवारी रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. माझ्या लेकीने आत्महत्या केलेली नाही, तर तिचा घातपात झाला आहे, असा टाहो फोडत, जोपर्यंत सासरच्या नराधमांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संतप्त पवित्रा नातेवाईकांनी घेतला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी नातेवाईकांची समजूत काढली व तत्काळ गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेतले. सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर इन कॅमेरा शवविच्छेदन करून सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पंचगंगा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अस्मितावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT