सतीश सरीकर, कोल्हापूर
कोल्हापूर शिवसेनेत सध्या अंतर्गत बंडाळी, नाराजी आणि समेटाचे अपयश पाहता कोल्हापूर ते मातोश्री (मुंबई) या राजकीय प्रवासातील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आता आवश्यक झाले आहे, अशी प्रतिक्रिया निष्ठावंत शिवसैनिकांतून व्यक्त होत आहे. कोल्हापुरातील शिवसैनिक व मातोश्रीतील नेतृत्व यांच्यातील संवाद, निष्ठा, विश्वास, बांधिलकी यांच्याशी जोडणारा राजकीय पूल सध्या ठिसूळ झाला आहे. अशा स्थितीत फक्त डागडुजी चालणार नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागेल.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूर सध्या पक्षासाठी मोठे आव्हान बनला आहे. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांची निवड झाल्यानंतर पदाधिकार्यांचा वाढता असंतोष, अनेकांची पक्षविरोधी वक्तव्ये, काहींचा थेट शिंदे शिवसेनेकडे कल, यामुळे या पुलाच्या पिलरला तडे जाऊ लागले आहेत. शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेला अविश्वास, संवादाची उणीव आणि नेतृत्वाकडे होणारे दुर्लक्ष आता उघडपणे चर्चेत येत आहेत. उपनेते संजय पवार यांनी पदाचा राजीनामा दिला. शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत प्रवेश केला. अनेक उपजिल्हाप्रमुख आणि पदाधिकारीही राजीनाम्याच्या पवित्र्यात आहेत.
निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मते आम्ही शिवसेनेवर प्रेम करतो, मातोश्रीवर आमची श्रद्धा आहे. पण सध्या कोल्हापूर ते मातोश्रीपर्यंत असलेल्या पदाधिकार्यांमुळे संवादाचा पूल गंजलेला वाटतो. जिल्ह्यातील नेत्यांच्या मतांना स्थान दिले जात नाही. संपर्क नेते आणि संपर्कप्रमुख जबाबदारी नीट पार पाडत नसल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. आता इथं आमचं ऐकून घेत नाहीत, असे बोलत आहेत. हा विरोध आता बंद खोलीत न राहता सोशल मीडियाच्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर पोहोचला आहे. याकडे वेळेत लक्ष न दिल्यास पक्षातील बंडखोरीचे पाणी पुन्हा उफाळेल. पक्षप्रमुखांनी स्वतंत्र निरीक्षकांच्या मदतीने कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील सेनेच्या गडांवर फेरपाहणी करावी. नाराज नेत्यांचे सल्ले ऐकून निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान द्यावे. जिथे पूल पूर्ण गंजले आहेत, तिथे नव्याने उभारणी करावी. संवाद, समन्वय आणि सन्मान हाच एकमेव त्यावर उपाय आहे.
पुलाचा पाया : निष्ठावंत शिवसैनिक
सळ्या व काँक्रीट : स्थानिक नेतृत्वाचे विश्वासाचे बंध
ओव्हरलोड : आक्रमक बाहेरून आलेली नेतृत्वशक्ती
वाहतूक : जनतेच्या अपेक्षांचे ओझे
गंज : दुर्लक्ष, अहंकार, संवादाचा अभाव
या संपूर्ण रचनेकडे तांत्रिक, तटस्थ आणि निस्सीम द़ृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. कारण सध्या कोल्हापूर ते मातोश्री असा प्रवास राजकीय ट्रॅफिकमध्ये अडकला आहे.
कोल्हापूर ते मातोश्री हे अंतर फक्त किलोमीटरचे नसून ते मनांचे, निष्ठांचे, विचारांचे अंतर आहे. सध्या हे अंतर वाढत आहे. जोपर्यंत या राजकीय पुलाची दुरुस्ती, ऑडिट आणि नवे आराखडे तयार केले जात नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचे गड सुरक्षित राहणार नाहीत. शिवसेनेच्या भल्यासाठी आणि कोल्हापूरचा गड वाचविण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटचा अलार्म तातडीने करावा लागेल, असे शिवसैनिकांतून सांगितले जात आहे.