तडीपार Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Crime | शिरोलीच्या माजी उपसरपंचासह सहाजण वर्षभरासाठी हद्दपार

शिरोली एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Shiroli Former Deputy Sarpanch Tadipar Action

नागाव : शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोठी कारवाई करत सहा जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

शरीरिक त्रास व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे, तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रे व घातक शस्त्रांच्या बळावर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले होते. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हद्दपारीच्या कारवाईत शिरोलीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश अनिल कोळी (वय ३५, रा. ग्रामपंचायतजवळ, शिरोली पुलाची) याच्यासह श्रीकांत तानाजी मोहिते (वय ३४, रा. समता परिसर, अण्णाभाऊ साठे चौक, शिरोली पुलाची) आणि कार्तिक परशुराम राजुगरीकर (वय ३१, रा. विलासनगर, माळवाडी, शिरोली पुलाची) यांचा समावेश आहे.

याशिवाय या टोळीतील अनिकेत आनंदा कांबळे (रा. शिरोली पुलाची) व ऋषिकेश उर्फ प्रताप शिवाजी भोरे (रा. शिरोली पुलाची) हे वडगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर अली उर्फ जमीर वालेचांद तानेखान (रा. शिरोली पुलाची) हा फरार असून, न्यायालयीन कोठडीत असलेले व फरार आरोपी ताब्यात आल्यानंतर अथवा कारागृहातून सुटल्यानंतर त्यांच्याविरुद्धही हद्दपारीची कारवाई लागू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. दरम्यान, शिरोलीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाल्याने शिरोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT