Shirol Encroachment Removal
जयसिंगपूर : शिरोळ येथील नरसोबावाडी मार्गावरील हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवरून प्रशासकीय अधिकारी आणि अतिक्रमणधारकांमध्ये जोरदार वादावादी झाली. एकास एक असा दुजाभाव न करता सरसकट अतिक्रमण हटवा, असा आक्रमक पवित्रा शरद देशमुख यांनी घेतल्याने काही काळ परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर महामार्ग पोलीस निरीक्षक राणी पाटील यांनी मध्यस्थी करत रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून दिल्यानंतर वातावरण निवळले.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गठित 'जिल्हा रस्ते सुरक्षा समिती', मिरज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील धोकादायक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबवली जात आहे. समितीचे विनायक रेवणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत माने देशमुख हॉलजवळील जुने अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत सांगली फाटा, उदगाव, इचलकरंजी फाटा, जयसिंगपूर चौक ते तेरवाड या मुख्य मार्गांची पाहणी करण्यात आली. रस्त्याच्या मध्यभागापासून १२ मीटर अंतरापर्यंतची अतिक्रमणे हटवून अपघातांना आमंत्रण देणारी धोकादायक वळणे मोकळी केली जात आहेत. दरम्यान, रस्त्यालगतचे मोठे डिजिटल फलक आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी ऊस शेती यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
या मोहीम प्रसंगी मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुमार गुळवे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे, ओंकार चौगुले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोहीम पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने नियमित लक्ष ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.