Shirol Takwade group fight
शिरढोण : टाकवडे (ता. शिरोळ) येथे पूर्ववैमनस्य आणि एकमेकांकडे पाहण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिरोळ आणि जयसिंगपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील उरूस सुरू असून शुक्रवारी रात्री आयोजित मनोरंजन कार्यक्रमादरम्यान काही युवकांमध्ये हुल्लडबाजी झाली. त्यातून दोन गटांत बाचाबाची होऊन हाणामारी झाली. त्यानंतर बुरगुल चौकातही रात्री उशिरा दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. हा वाद मिटल्याचे वाटत असतानाच शनिवारी दुपारी भर चौकात पुन्हा हाणामारी झाली.
या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले. माहिती मिळताच शिरोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून दोघांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वाद अधिक चिघळू नये यासाठी ग्रामपंचायत गटनेते अमोल चौगुले यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही गटांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.
शुक्रवारी रात्री मनोरंजन कार्यक्रमात हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनाही धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. कार्यक्रमास मोठी गर्दी होती; मात्र केवळ दोन पोलीस कर्मचारी असल्याने जमावावर त्वरित नियंत्रण आणणे कठीण झाले. त्यामुळे नागरिकांत पोलिस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.