पाणंद रस्ते सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत  Pudhari
कोल्हापूर

Shirol Panand Road Encroachment | शिरोळ तालुक्यातील पाणंद रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात : महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

शेतकऱ्यांकडूनच अतिक्रमणे करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये वादाचे प्रसंग

पुढारी वृत्तसेवा

Shirol Taluka Encroached Panand Roads

कवठेगुलंद : शिरोळ तालुक्यातील बुबनाळ, गणेशवाडी, आलास, शेडशाळ, औरवाड, गौरवाड आणि कवठेगुलंद परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणारे पाणंद रस्ते सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असताना शेतात जाण्याचे मार्गच बिकट झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, काही शेतकऱ्यांकडूनच पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये वादाचे प्रसंग वाढत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

महसूल विभागाच्या नोंदीप्रमाणे शेतात बैलगाडी, ट्रॅक्टर तसेच शेतीसाठी लागणारे साहित्य ने-आण करण्यासाठी ‘पाणंद रस्ते’ राखीव असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी शेतांच्या सीमारेषा वाढवत या रस्त्यांवरच नांगर फिरविणे, सरी सोडणे, काटेरी झुडपे टाकणे, दगड रचणे किंवा थेट पिकांची लागवड करण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी अनेक रस्ते अरुंद झाले असून काही ठिकाणी पूर्णपणे बंद झाले आहेत.

या अतिक्रमणांचा फटका शेतकऱ्यांना शेतीच्या कामांदरम्यान बसत आहे. पेरणी, कोळपणी आणि कापणीच्या काळात ट्रॅक्टर, मळणी यंत्र किंवा इतर शेती अवजारे शेतात नेणे कठीण बनले आहे. आपत्कालीन परिस्थितीत, विशेषतः सर्पदंश किंवा अपघात झाल्यास रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचविणेही अवघड ठरत आहे.

पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे शेतकऱ्यांमध्ये सातत्याने वाद निर्माण होत असून काही प्रकरणांत हाणामारी व पोलीस तक्रारीपर्यंत बाब पोहोचत आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवर पाणी साचून चिखल निर्माण होत असल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते.

‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ तसेच अन्य स्थानिक योजनांमधून हे रस्ते मोकळे करून त्यांचे खडीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र महसूल विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनास्थेमुळे अतिक्रमणे हटविण्याबाबत ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. अनेकदा राजकीय दबाव किंवा स्थानिक वादांचे कारण देत प्रशासन कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला जात आहे.

पावसाळ्यापूर्वी महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात सर्व पाणंद रस्त्यांची मोजणी करून अतिक्रमणे हटवावीत आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. अन्यथा आगामी हंगामात शेतीची कामे कशी करायची, असा गंभीर प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT