Nrusinghwadi Smart Meter Opposition Pudhari
कोल्हापूर

Nrusinghwadi News | नृसिंहवाडीत स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; ग्रामसभेत ठराव एकमताने मंजूर

महावितरण अधिकाऱ्यांसमवेत चर्चा; हा केवळ खाजगीकरणाचा डाव असून सर्वसामान्यांची लूट

पुढारी वृत्तसेवा

Nrusinghwadi Smart Meter Opposition

नृसिंहवाडी : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे महावितरण कंपनीतर्फे बसवण्यात येणाऱ्या 'स्मार्ट मीटर'ला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसभेत नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत, गावात एकही स्मार्ट मीटर बसवू देणार नसल्याचा इशारा देत एकमताने ठराव मंजूर केला.

महावितरणकडून सध्या जुने वीज मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, या स्मार्ट मीटरमुळे विजेचे बिल भरमसाठ येण्याची शक्यता आणि प्रीपेड पद्धतीमुळे सर्वसामान्यांची होणारी अडवणूक, याबद्दल ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. घरात कुणीही नसताना कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मिटर बसवले गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याच पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी ग्रामपंचायतीत महावितरणचे अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली.

बैठक सुरू होताच ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. "सध्याचे मीटर सुरळीत सुरू असताना आणि नागरिक नियमित वीजबिल भरत असताना नवीन मीटरची सक्ती कशासाठी?" असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. तसेच संभाजीनगर परिसरात स्मार्ट मीटर जळणे, वीजपुरवठा आपोआप खंडित होणे, वीजबिल वाढून येणे यावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरचे फायदे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु संतप्त ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे धुडकावून लावले. "हा केवळ खाजगीकरणाचा डाव असून यामुळे सर्वसामान्यांची लूट होणार आहे," असा थेट आरोप करत नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.

यावेळी झालेल्या जोरदार चर्चेनंतर, जोपर्यंत शासनाकडून या योजनेबाबत स्पष्टता येत नाही आणि जनतेचा संभ्रम दूर होत नाही, तोपर्यंत नृसिंहवाडीत कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर लावू दिले जाणार नाहीत, असा ठराव ग्रामस्थांनी एकमुखाने मंजूर केला.

यावेळी महावितरणचे अभियंता सलीम मुजावर यांनी स्मार्ट मीटरबाबत असणाऱ्या शंका दूर करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा ठिकाणी जुने मीटर व स्मार्ट मिटर दोन्ही लावण्यात येईल. यामुळे वीजबिल वाढीच्या व इतर तक्रारी दूर होतील, असे आश्वासन दिले. ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या -

१. शासनाकडून निश्चित धोरण येत नाही तोपर्यंत नव्याने स्मार्ट मीटर बसवू नयेत.

२. नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र म्हणून कायमस्वरुपी भारनियमन बंद करावे.

३. वीज बिल वाढल्याच्या तक्रारींचे निरसन जलद करावे.

४. नृसिंहवाडी तीर्थक्षेत्राचा विचार करून ऑटो डिस्कनेक्ट करण्यात येऊ नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT