कुरुंदवाड : कृष्णा पंचगंगा या दोन्ही नद्यांची रात्रीतून पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज पहाटे मजरेवाडी-अकिवाट रस्त्यावरील भोरे पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने अकिवाट-मजरेवाडी मार्ग बंद झाला आहे. बस्तवाड-अकिवाट हा मार्गही दुपारपर्यंत पाण्याखाली जाईल, या भीतीने बस्तवाडमधील ७० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे.
कृष्णा नदीचे पाणी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मजरेवाडी अकिवाट रस्त्यावर येऊ लागले आहे. रस्त्यावर दिड फूट पाणी आहे. तरीही पाण्यातूनच दुचाकी चारचाकी वाहनाची वाहतूक सुरू आहे. दरम्यान मजरेवाडी ते बाळूमामा मंदिर मार्गे गुरुदत्त कारखान्यावरुन अकिवाटला जाण्यासाठी पर्यायी मार्ग खुला आहे.
नृसिहवाडी कृष्णा पंचगंगा संगम घाटाजवळचे सर्वात पहिले गाव असणार्या बस्तवाडला पुराचा विळखा पडतो. शुक्रवारी दुपारी कुरुंदवाड - बस्तवाड मार्ग पाण्याखाली गेला आहे तर बस्तवाड अकिवाट रस्त्यावर पाणी आले आहे. मात्र रस्ता बंद झाला नाही. दुपारपर्यंत हा रस्ता पाण्याखाली जाऊन बस्तवाडला महापुराचा विळखा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरांसह गावातील सत्तर टक्के ग्रामस्थ प्रशासनाच्या सुचनेनुसार प्रांपचिक साहित्यासह सुरक्षित ठिकाणी स्थंलातर करत आहेत.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार अनिलकुमार हेळकर आणि गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी सकाळी भेट देऊन पुरस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांनी सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी स्थंलातर होण्याच्या सूचना केल्या.
बस्तवाडचे सरपंच अम्माजान पाटील, ग्रामसेवक महालिंग अकिवाटे, तलाठी, पोलीस पाटील सुखदेव कोळी, सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई पटेल, माजी सरपंच जे. डी. चव्हाण यांच्यासह गावातील तरुण मंडळे पुरस्थितीवर सतत लक्ष ठेऊन आहेत. तसेच प्रशासनाच्या सुचनेनुसार ग्रामस्थांना स्थंलातर करण्यास मदत करीत आहेत.