Govinda Death Heart Attack Shirol Kolhapur
जयसिंगपूर : दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटून घरी परतताना काळाने घाला घातल्याने शिरोळ येथील एका तरुण खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवशक्ती तरुण मंडळाचा कार्यकर्ता आणि हनुमान गोविंदा पथकाचा खेळाडू अनिकेत ऊर्फ 'काना' रजनीकांत निकम (वय २८) याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे शिरोळ शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत हनुमान गोविंदा पथकासोबत सरवडे येथील दहीहंडी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर शिरोळकडे परतत असताना प्रवासात त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ ठिसूर्ली येथील खासगी रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार केले.
त्यानंतर पुढील उपचारासाठी शिरोळकडे आणत असताना वाटेतच त्याला हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अनिकेतच्या पश्चात आई, वडील आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. अत्यंत मनमिळावू आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांत नेहमी आघाडीवर राहणाऱ्या अनिकेतच्या अकाली निधनाने त्याचे मित्रपरिवार, मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.