Aurwad Aalas Road Damaged  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | औरवाड - आलास रस्ता निकृष्ट कामामुळे पुन्हा उखडला : ग्रामस्थांमध्ये संताप

एका वर्षात हा रस्ता दुसऱ्यांदा खराब झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

Shirol Potholes Rural Roads Issues

कवठेगुलंद : ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ अंतर्गत तयार करण्यात आलेला औरवाड ते आलास हा रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुन्हा एकदा उखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षात हा रस्ता दुसऱ्यांदा खराब झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र कामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच नागरिकांनी शंका व्यक्त केली होती. पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने तात्पुरती दुरुस्ती करत खड्डे बुजवले होते.

परंतु ही ‘मलमपट्टी’ही अल्पावधीतच निष्फळ ठरली असून, काही महिन्यांतच रस्ता पुन्हा खराब झाला आहे. सध्या अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे निघून गेले असून रस्त्यावर खडी आणि मातीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, शाळकरी विद्यार्थी तसेच शेतकरी प्रवास करतात. खड्डेमय आणि खडबडीत रस्त्यामुळे दुचाकी घसरण्याच्या घटना वाढल्या असून अपघातांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढले आहे. रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी धोकादायक बनत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

एकाच वर्षात दोनदा रस्ता खराब झाल्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या संगनमतातून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषी कंत्राटदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच निकृष्ट कामाला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, रस्त्याचे काम पुढील सात ते पंधरा दिवसांत दर्जेदार पद्धतीने सुरू झाले नाही, तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT