Kolhapur Short Circuit Farm Fire Pudhari
कोल्हापूर

Sugarcane Fire Kolhapur | शिरगावात शॉर्टसर्किटने पाऊण एकरातील ऊस जळून खाक

शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान; शेतकरी हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Short Circuit Farm Fire

विशाळगड: शिरगाव पैकी यादववाडी (ता. शाहुवाडी) येथील शेतकरी चंद्रकांत गणपती यादव यांच्या पाऊण एकर (३० गुंठे) क्षेत्रातील उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने उभा ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वर्षभर कष्टाने जोपासलेल्या पिकाची डोळ्यादेखत राखरांगोळी झाल्याने यादव कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

चंद्रकांत यादव यांनी सुखठाना परिसरात उसाची लागवड केली आहे. या ऊसशेतीवरून महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. या तारा लोंबकळत असून, वाऱ्यामुळे एकमेकांवर घासल्या जात असल्याने ठिणग्या पडून आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिणगीने क्षणार्धात उसाच्या शेतात आगीचा भडका उडाला आणि पाहता पाहता संपूर्ण पाऊण एकरातील ऊस आगीच्या विळख्यात सापडला.

आधीच शेतीचा वाढता उत्पादन खर्च, पावसाची अनिश्चितता आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत हातातोंडाशी आलेले नगदी पीक जळून खाक झाल्याने यादव यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठी हानी टळली.

लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा जीव धोक्यात आला असून, महावितरणने अशा धोकादायक वाहिन्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT