कोल्हापूर

कोल्हापूर-शिर्डी, अहमदाबाद, पुणे, गोवा विमानसेवा लवकरच

मोहन कारंडे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातून लवकरच शिर्डी, अहमदाबाद, पुणे आणि गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नवी टर्मिनस या इमारतीचे रविवारी उद्घाटन होत आहे. यानंतर येत्या काही दिवसांत या विमानसेवेलाही प्रारंभ होईल, या द़ृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापुरातून सध्या मुंबई, हैदराबाद आणि बंगळूर या मार्गावर विमानसेवा सुरू आहे. यापैकी बंगळूरसाठी आठवड्यातून पाच दिवस दोन कंपन्यांच्या विमानसेवा सुरू आहेत. यामध्ये आता बंद झालेल्या अहमदाबाद सेवेचाही समावेश होणार आहे. अहमदाबादसह शिर्डी या मार्गासाठी कंपन्यांचा प्रस्ताव आहे. याखेरीज पुणे-कोल्हापूर-गोवा अशा मार्गासाठीही कंपनी इच्छुक आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.

विमानतळाने ओलांडला साडेपाच लाख प्रवासी टप्पा

कोल्हापूर विमानतळावर 9 डिसेंबर 2018 पासून उडान योजनेंतर्गत प्रवासी विमानसेवा नियमितपणे सुरू झाली. यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका बसला. मात्र त्यातही कोल्हापूर विमानतळाने आपली क्षमता सिद्ध करत कोरोना कालावधीत उडान योजनेंतर्गत देशात सर्वाधिक प्रवासी वाहतूक करण्याचा मान पटकावला. यावरून कोल्हापुरात प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या संधी स्पष्ट झाल्या.

विकासाला मिळणार चालना

कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणारी अत्यंत देखणी आणि प्रशस्त अशी नवी टर्मिनस इमारत उभारण्यात आली आहे. रविवारी या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर लवकरच तिचा प्रत्यक्ष वापर सुरू होईल. या इमारतीमुळे विमानतळाच्याच नव्हे तर कोल्हापूरच्या सौंदर्यातही भर पडेल आणि विकासालाही चालना मिळणार आहे.

कोल्हापूर विमानतळावर लवकरच एअरबस उतरणार आहे. याकरिता आवश्यक धावपट्टी विस्तारीकरण केले जात आहे. 1370 मीटर लांबीची धावपट्टी आता 1900 मीटरपर्यंत विस्तारित केली आहे. त्याचा वापर सध्या सुरू आहे. ही धावपट्टी 2300 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्याकरिता आवश्यक भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. धावपट्टी 2300 मीटरची झाली की, एअरबससारखी विमानेही कोल्हापुरातून झेपावणार आहेत.

नाईड लँडिंगची सुविधा

13 नोव्हेंबर 2022 पासून कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली आहे. यामुळे राज्यात कोल्हापूर विमानतळाचे महत्त्व वाढले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, नागपूर जिल्ह्यासाठीही याचा मोठा फायदा होत आहे.

कार्गो सुविधा द़ृष्टिपथात

लवकरच कार्गो सुविधा सुरू होणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून प्रवासी विमानातून 500 किलोपर्यंतच्या मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. याकरिता एजन्सी नेमण्याचे काम सुरू आहे.

अशी आहे नवी टर्मिनस इमारत

बांधकाम क्षेत्रफळ………3,900 चौ.मी.
सुरक्षा तपासणी बूथ………08
लगेज क्लेम कॅरूजल……..02
प्रवासी बैठक क्षमता………300
चेक इन काऊंटर………….10
व्हीआयपी लाऊंज………..01
कार पार्किंग……………..190 कार

SCROLL FOR NEXT