पंकज चव्हाण
इचलकरंजी : इचलकरंजी शहरात शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने करण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणाने आता मोठ्या घोटाळ्याचे रूप धारण केले असून, या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुरुवातीला काही लाखांपुरती मर्यादित वाटणारी ही फसवणूक आता कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तक्रारदारांची संख्या 16 वर पोहोचली आहे. आतापर्यंत समोर आलेली फसवणुकीची रक्कम 34 लाखांच्या पुढे गेली आहे. हा घोटाळा आणखी व्यापक असल्याची भीती आहे. या प्रकरणात प्रकाश सूर्यकांत मेहत्तर व त्याची पत्नी प्रिया मेहत्तर या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला. प्रकाश मेहत्तर सध्या पोलिस कोठडीत आहे. तपासात समोर येणाऱ्या बाबींवरून हा घोटाळा केवळ एका दाम्पत्यापुरता मर्यादित नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील काही जुने जाणकार, पूर्वी अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारात सक्रिय असलेली मंडळी आणि गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणारे काही चेहरे या प्रकरणाच्या भोवऱ्यात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आणखी दोनजण पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत. घोटाळ्याचे संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी अधिक सखोल आणि तांत्रिक चौकशीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
रक्कम अडकल्याने अनेकांची अवस्था बिकट
या घोटाळ्यात सर्वाधिक फटका शहरातील युवक, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसला आहे. जलद नफा, निश्चित परतावा आणि विश्वासार्ह मार्गदर्शन अशा गोड बोलण्याला भुलून अनेकांनी आपल्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई या योजनेत गुंतवली. आज तीच रक्कम अडकून पडल्याने अनेकजण आर्थिकदृष्ट्या कोलमडले असून, मानसिक ताणाखाली आहेत. काहींनी कर्ज काढून गुंतवणूक केली असल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.