Kolhapur Share Broker | कोल्हापूर जिल्ह्यातील शेअर ब्रोकर ‘ब्लॅकमेलिंग’च्या कचाट्यात! 
कोल्हापूर

Kolhapur Share Broker | कोल्हापूर जिल्ह्यातील शेअर ब्रोकर ‘ब्लॅकमेलिंग’च्या कचाट्यात!

बनावट शेअर कंपन्यांनी केलेल्या घोटाळ्यांचा परिणाम : अनेक शेअर ब्रोकर्सच्या व्यवसायावर विपरीत परिणाम

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील अनेक परवानाधारक शेअर ब्रोकर्स ब्लॅकमेलिंगच्या कचाट्यात सापडू लागले आहेत. त्यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय एक तर बंद केले आहेत किंवा त्याचा व्याप कमी केलेला दिसत आहे.

हजारावर ब्रोकर्स!

जिल्ह्यात कायदेशीर मार्गाने शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करणारे हजारहून अधिक शेअर ब्रोकर्स आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे परिपूर्ण प्रशिक्षण आणि स्टॉक एक्स्चेंजसह सेबीकडे रीतसर नोंदणी करून या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपले व्यवसाय चालविल्याचे दिसत आहेत. जे कायदेशीर शेअर ब्रोकर्स आहेत, त्यांच्या व्यवसायाबद्दल किंवा आर्थिक व्यवहाराबद्दल जिल्ह्यात आजपर्यंत एकही तक्रार दाखल नाही.

बनावट मार्केटिंग कंपन्या!

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अनेक बनावट शेअर मार्केटिंग कंपन्या उदयास आल्या आणि त्यांनी गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घालून पोबारा केला आहे. ए. एस. ट्रेडिंग ही अशीच एक बोगस कंपनी होती. अशा बोगस मार्केटिंग कंपन्यांमुळे गेल्या काही दिवसांत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांबद्दल एक प्रकारचे संशयाचे वलय निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून सचोटीने हा व्यवसाय करणारे जिल्ह्यातील शेअर ब्रोकरही अडचणीत आल्याचे दिसत आहेत.

हजारो लोकांची गुंतवणूक!

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे बहुतांश गुंतवणूकदार थेट गुंतवणूक न करता खासगी आणि रीतसर परवाना असलेल्या शेअर ब्रोकर्संच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. जिल्ह्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे दीड लाखांहून अधिक गुंतवणूकदार असून त्यांनी परवानाधारक ब्रोकर्सच्या माध्यमातून १००० ते १२०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केलेली आहे. संबंधित गुंतवणूकदारांना जो काही असेल तो वार्षिक परतावादेखील मिळत आहे. अशा गंतवणुकीबद्दल कुणाच्याही तक्रारी दिसत नाहीत.

ब्लॅकमेलिंगचा फंडा!

काही बोगस शेअर मार्केटिंग कंपन्यांनी जिल्ह्यात आर्थिक धुमाकूळ घातल्यामुळे त्याची झळ या परवानाधारक शेअर ब्रोकर्सना बसत आहे. काही समाज उपद्रवी लोक आणि काही तथाकथित संघटनांनी या निमित्ताने अशा परवानाधारक ब्रोकर्सना घेरायला सुरुवात केली आहे. आमची आर्थिक मागणी मान्य करा, अन्यथा तुमच्या व्यवसायाबद्दल तक्रार करतो, अशा धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे ही मंडळी संबंधित ब्रोकर्सच्या गुंतवणूकदारांमध्येही पद्धतशीरपणे संभ्रम निर्माण करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अनेक गुंतवणूकदार आपली गुंतवणूक एकरकमी काढून घेताना दिसत आहेत. त्याचा परिणाम परवानाधारक शेअर ब्रोकर्सवर आणि एकूणच जिल्ह्यातील शेअर व्यवसायावर होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT