‌Kolhapur Crime News Pudhari
कोल्हापूर

‌Kolhapur Crime: ‘तो‌’ व्हिडीओ ठरला स्फोटक...संसाराचा झाला इस्कोट; आई देवाघरी- वडील तुरुंगात, चिमुकले जीव पोरकी

Shanivar Peth Kolhapur News: शनिवार पेठेतील चिमुरडी भावंडे आईच्या मायेला झाली पोरकी

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Swati Bhat Ganesh Hubale Crime Case

दिलीप भिसे

कोल्हापूर : स्वाती भाट अन्‌‍ गणेश हुबाळे यांच्यात प्रेमायण सुरू झाले. कुटुंबाचा विरोध असतानाही 2012 मध्ये जन्मदात्यांना सोडून स्वातीने गणेशशी लग्नगाठ बांधली. संसार सुरू झाला. दाम्पत्याने परिणिती आणि शिवम या गोडस अपत्यांना जन्म दिला... छोटेखानी कुंटुंब अन्‌‍ चिमुरड्यांच्या भविष्याची स्वप्ने रंगवीत असतानाच कुटुंबात संशयकल्लोळ संचारला. घोगावणाऱ्या वादळाला थोपविण्याचा प्रयत्न होत असतानाच संसाराचा ‌‘विस्कोट‌’ करणारी स्फोटक व्हिडीओ क्लिप हाताला लागली... साक्षात पतीच्या विवाहबाह्य प्रणयचाळ्याच्या क्लिपमुळे स्वाती पुरती कोसळली...

प्रेमातून एकमेकाला दिलेल्या आणाभाका, वचनांसह सुखी संसाराच्या रंगविलेल्या स्वप्नांचा भंग झाला... कौटुंबिक कलह...वाद- विवाद... चार भिंतीआड दाम्पत्यातील संघर्ष... अखेर या कौटुंबिक कलहाची परिणिती काय... तर साक्षात मृत्यू... कोल्हापुरातील शनिवार पेठेत नेमका हाच थरारक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केलेल्या स्वातीला निर्ढावलेल्या आणि दगडाचे काळीज असलेल्या पतीने जनावरासारखी अमानुष मारहाण केलीच... शिवाय दोन्ही हातांनी ‌‘गळा‌’ घोटून तिची हत्या केली. राक्षसी कृत्याला स्वाती बळी पडली... खुनी गणेश हुबाळेची जेलवारी सुरू झाली; मात्र साऱ्या थरारनाट्यात दोन चिमुरडी भावंडे आईच्या मायेला पोरकी झाली.

भाट कुटुंब मूळचे शिरोळ तालुक्यातील अब्दुललाटचे... उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब कोल्हापुरात सानेगुरुजी वसाहत, राजोपाध्येनगर येथील बी. डी. कामगार वसाहत येथे आश्रयाला आले. दगडू भाट यांना तीन अपत्ये. त्यात स्वाती त्यांची लाडकी द्वितीय कन्या... आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण... संशयित गणेशची बहीण दुधाळी परिसरात राहते. गणेशची भाची आणि स्वाती दोघी एकमेकींच्या मैत्रिणी. त्यातून गणेश आणि स्वाती यांच्यात ओळख वाढली. त्यानंतर त्यांचे सूत जमले. दोघांनी प्रेमविवाह केला.

गणेशचा कोल्हापुरी फेटे विक्रीचा व्यवसाय... लग्नानंतर दोघांच्या संसारात सारं काही अलबेल होतं... दाम्पत्याने परिणिती आणि शिवम या दोन मुलांना जन्म दिला. सुखाचा संसार सुरू होता. ‌‘हम दो हमारे दो‌’ आटोपशीर कुटुंबांचा सिलसिला सुरू होता. अलीकडच्या काळात कौटुंबिक वादातून अगदी किरकोळ कारणातूनही स्वाती आणि गणेश यांच्यात कुरबुऱ्या वाढल्या होत्या. स्वाती गणेशच्या वर्तवणुकीवर संशय घेऊ लागली. त्यातून दोघांत हमरीतुमरी होऊ लागली. भाट व हुबाळे कुटुंबीयांसह काही मध्यस्थांनीही दाम्पत्यामधील कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न केला; मात्र संसारात उठलेले वादळ काही काळापुरते शमले होते. पुन्हा पुन्हा तेच कारण आणि त्यावरून गदारोळ...

अलीकडच्या काळात स्वातीच्या हातात एक स्फोटक व्हिडीओ क्लिप सापडली... विवाहबाह्य प्रणयचाळ्याची क्लिप पाहून स्वाती पुरती कोसळली. या कारणावरून त्यांच्यातील मतभेद पराकोटीला पोहोचले. दाम्पत्यातील वाद-विवाद नेहमीचेच ठरल्याने नातेवाईकांनी या प्रकाराकडे काहीसा कानाडोळा केला; पण संशयकल्लोळ, स्फोटक क्लिप आणि आर्थिक कारणातून त्याच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच गेला होता.

शनिवार, दि. 7 रोजी मध्यरात्री गणेश आणि स्वाती यांच्यातील वादाने वेगळे वळण घेतले. प्रकरण हातघाईवर आले. गणेश हुबाळे याने स्वातीला अमानुष मारहाण केली. शिवाय दोन्ही हातांनी तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. स्वाती गंभीर जखमी झाली. प्रकृती अत्यवस्थ बनल्याने गणेशने तिला खासगी रुग्णालयात हलविले. सकाळी मुलगी परिणती (वय 13) आणि शिवम (वय 9) यांनी घरात मम्मीचा शोध घेतला. दिवसभर ही भावंडे अनभिज्ञ होती. दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यातून दूरध्वनी आल्यानंतर स्वाती गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असल्याचे समजल्यानंतर भाट कुटुंबीयांना धक्का बसला.

एका सुखी संसाराची वाताहत !

स्वातीची खालावलेली स्थिती पाहून गणेश सोमवारी सकाळी भानावर आला. संतप्त नातेवाईकांचा रोष लक्षात घेऊन तो पसार झाला. झालं... दुपारी स्वातीचा मृत्यू झाला... या घटनेमुळे नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला... पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारून संशयिताच्या अटकेची मागणी केली. स्वातीचा गळा घोटणाऱ्या गणेशला अटक केल्याखेरिज मृतदेहाचा ताबा घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. एक सुखी संसार असा पद्धतीने उद्ध्वस्त झाला. आई देवाघरी गेली आणि वडील तुरुंगात गेल्याने चिमुकले जीव दोघांच्याही प्रेमाला मुकले आहेत. भविष्यात या चिमुकल्यांचे भविष्य काय, या विचारानेच नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT