Wife Dies After Husband Death Shahuwadi
विशाळगड : "विवाहबंधनात असताना सात जन्माच्या सोबतीचे दिलेले वचन मृत्यूतही पाळले..." अशीच काहीशी हृदयद्रावक घटना शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथे घडली आहे. भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार गणपती धोंडीबा महाडिक (वय ९०) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले आणि त्यांच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने पत्नी लक्ष्मीबाई गणपती महाडिक (वय ८५) यांनीही अवघ्या काही तासांतच, शुक्रवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून या 'एकनिष्ठ' दांपत्याला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला.
गणपती महाडिक हे एक कर्तव्यदक्ष सैनिक होते. त्यांनी भारतीय सैन्य दलात सुभेदार पदापर्यंत सेवा बजावली होती. विशेष म्हणजे, १९६२ चे चीन युद्ध आणि १९६५ व १९७१ चे पाकिस्तान विरुद्धचे युद्ध अशा ऐतिहासिक युद्धांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावर शौर्य गाजवले होते. निवृत्तीनंतर ते गावात सामाजिक कार्यातही सक्रिय होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अतिशय कष्ट आणि चिकाटीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली होती. त्यांना पत्नी लक्ष्मीबाई यांची मोलाची साथ लाभली. लक्ष्मीबाई यांनीही मायेने आणि कष्टाने आपला संसार फुलवला होता.
गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने गणपती महाडिक यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पडले. नातेवाईक आणि ग्रामस्थ जड अंतःकरणाने घरी परतले होते. संपूर्ण महाडिक कुटुंब शोकाकुल असतानाच, शुक्रवारी पहाटे एक दुर्दैवी बातमी आली. पतीच्या निधनाचा धक्का आणि अनेक वर्षांची सोबत सुटल्याचे दुःख लक्ष्मीबाई यांना सहन झाले नाही. पतीच्या निधनानंतर अवघ्या १२ ते १५ तासांतच त्यांनीही जगाचा निरोप घेतला.
ज्या घरातून गुरुवारी पतीची अंत्ययात्रा निघाली, त्याच घरातून शुक्रवारी पत्नीचीही अंत्ययात्रा निघाली. सैन्य दलातील शौर्य गाजवणारा योद्धा आणि त्यांना सावलीसारखी साथ देणारी त्यांची पत्नी, या दोघांच्या एकापाठोपाठ जाण्याने महाडिक परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या या निधनाने पेरीडसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.