Parle Ninai Mahadev temple wall collapse
विशाळगड : शाहूवाडी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परळे निनाई येथील प्राचीन महादेव मंदिराची एक भिंत कोसळली. मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असल्याने भाविकांना दर्शनासाठी मोठी गैरसोय होत आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ मंदिराची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
या महादेव मंदिराचे बांधकाम भव्य मोठ्या दगडी फाडी (दगडी तुकडे) आणि हेदर (लांबट दगडी खांब) वापरून केले आहे. मंदिराचे छत दगडी शिळांचे असून दर्शनी भागात चार भक्कम दगडी खांब आहेत. मंदिरासमोर नंदीची सुंदर मूर्ती असून आत गाभाऱ्यात प्राचीन शिवलिंग आहे. संपूर्ण बांधकाम केवळ दगडाच्या फाडी, हेदर आणि दगडी फरशीने केले असल्याने त्यातील प्राचीन कलाकुसरीचे देखणे रूप मनमोहक आहे. ही प्राचीन बांधकाम पद्धत मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देते.
या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर "पांडवकालीन महादेव मंदिर" असा फलक लावण्यात आला आहे, ज्यामुळे हे मंदिर अतिशय प्राचीन असावे, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, हे मंदिर पुरातत्व विभागाकडे नोंदणीकृत आहे की नाही, याची सरपंच आणि ग्रामसेवक यापैकी कोणालाही कल्पना नाही.
आमच्या वाडवडिलांच्यापासून हे मंदिर आहे, असे आम्हाला सांगण्यात येत आहे, पण नेमकं कधी आणि कोणी मंदिर बांधले, हे सांगणे कठीण आहे.- सुरेश चौगुले, ग्रामपंचायत सदस्य