Two Children Injured in Gaur Attack Chandoli
बांबवडे : चांदोली अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उखुळ (ता. शाहूवाडी) येथे गव्याने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन शाळकरी मुलांसह तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातात संजय बाळू वडाम (वय ४०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा मुलगा आदर्श (वय ११) आणि पुतण्या अनुज (वय १४) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय वडाम हे मुलगा व पुतण्यासह मणदूर येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून संध्याकाळी उखुळकडे परतत असताना मुख्य रस्त्यावर अचानक चांदोली अभयारण्यातून आलेल्या गव्याने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या धडकेत संजय वडाम रस्त्याच्या कडेला फेकले गेले आणि त्यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली. दोन्ही मुलेही जखमी झाली. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमींना खासगी वाहनाने शितूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. संजय वडाम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले, तर दोन्ही मुलांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान, गेल्या महिनाभरात या परिसरात गव्याच्या हल्ल्यांच्या किंवा धडकांच्या सहा ते सात घटना घडल्या आहेत. तरीही वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जखमींना वेळेवर मदत मिळत नसल्याची तक्रारही नागरिकांकडून केली जात आहे.
वनविभागाने तातडीने उपाययोजना करून मानवी वस्तीतील वन्यप्राण्यांचा वावर रोखावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.