कोल्हापूर

Kolhapur murder | शहापूर हादरले! महालक्ष्मी नगरमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पुढारी वृत्तसेवा

यड्राव: शहापूर येथील कृष्णानगर समोरील महालक्ष्मीनगर परिसरात एका अज्ञात तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मारेकऱ्यांनी रुमालाने गळा आवळून आणि त्यानंतर डोक्यात मोठा दगड घालून तरुणाचा चेहरा छिन्नविच्छिन्न केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

कृष्णानगरकडून सोलगेमळ्याकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावरील मोकळ्या रानात एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती आज सकाळी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला दगड आणि मृताची चप्पल मिळून आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा तरुण मुस्लिम समाजातील असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, चेहरा पूर्णपणे ठेचलेला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे.

तपासासाठी पोलीस यंत्रणा सतर्क

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली. यामध्ये पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक महावीर कुटे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पाचारण करण्यात आलेले श्वान घटनास्थळापासून सोलगे माळ्याच्या दिशेने गेले, ज्यामुळे तपासाला एक दिशा मिळाली आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून मृताचे फोटो पाठवण्यात आले आहेत. ओळख पटल्यानंतरच या हत्येचे नेमके कारण आणि आरोपींचा छडा लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, शहापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT