कोडोली : विक्री केलेल्या प्लॉटच्या नोंद झालेल्या जास्त क्षेत्रामध्ये फेरफार दुरुस्तीसाठी 6 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने सातवे (ता. पन्हाळा) येथील तलाठी हणमंत शंकर बदडे (वय 55, रा. अभिरुची बिल्डिंग, कसबा बावडा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यातील तक्रारदाराने सातवे येथे विक्री केलेल्या एका प्लॉटचे क्षेत्र खरेदी दस्तावर जास्त नोंदवले गेले होते. या चुकीच्या फेरफार नोंदीमध्ये दुरुस्ती करून मिळावी, यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जाप्रमाणे दुरुस्तीचे काम करून देण्यासाठी तलाठी हणमंत बदडे याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. यापूर्वीच 4 हजार रुपये तलाठी बदडे याला दिले होते. मात्र, उरलेल्या 6 हजार रुपयांसाठी त्याने तगादा लावल्याने तक्रारदाराने तक्रार नोंदवली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तक्रारीची शहानिशा करून तलाठी बदडे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील, निरीक्षक राजेंद्र सानप, कर्मचारी संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील आणि प्रशांत दावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.